। म्हसळा । प्रतिनिधी ।
दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील म्हसळा खरसई येथे आमनेसामने तीन दुचाकींची ठोकर लागून तीन दुचाकीवरील पाच जण गंभीर जखमी, तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच म्हसळा पोलीस खासगी रूग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले. जखमींना म्हसळा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात युनीकाँन दुचाकीचालक रुपेश कृष्णा वासकर (वय 27, रा.कुडगाव) हा गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत रुपेश याच्या दुचाकीवर बसलेली पाभरे येथील कुमारी चंदा काशिनाथ वेटकोळी (23) ही गंभीर जखमी झाली आहे. मयत हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुडगाव येथून म्हसळा पाभरेकडे येत होता. तर म्हसळाकडून मेंदडीकडे ट्रिपलसीट दुचाकीस्वार प्रकाश भिकुबा वाघमारे (20),वसंत भिकुबा वाघमारे (22), कल्पेश हरिश्चंद्र हिलम (23) हे जखमी झाले आहेत. तर कुडगावकडून तिसरा स्कूटीचालक राहुल गोविंद पाटील (31) हा म्हसळाकडे येत असताना या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. जखमींपैकी चौघांवर म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रूग्णालय आणि पनवेल येथे एमजीएम रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सपोनी संदिप कहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.