भातशेती करायची कि नाही? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

कोट्यवधींच्या कालव्यातून पाणी गायब

| कोलाड | प्रतिनिधी |

कोलाड पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. परंतु काही ठिकाणी ही कामे अपूर्ण स्थितीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे भातशेतीला जानेवारी महिना उजाडला तरी पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे उन्हाळी भातशेती करायची कि नाही, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे.

पूर्वी सुजलाम सुफलाम असणारा विभाग आता गेली 15 वर्षांपासून पाण्यापासून वंचित असुन काम करण्यासाठी एक-दोन वर्षे द्या, नंतर पूर्वी सारखेच पाणी सोडू म्हणणाऱ्या कोलाड पाटबंधारे विभागाने शेतकरी वर्गाचा विश्वासघात केला आहे. तर ठराविक ठिकाणी सुरु असणारे पाणी कालव्याच्या साफसफाई दुरुस्तीमुळे अद्याप सुरु झाले नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात पडला आहे.

पाटबंधारे खात्याच्या आडमुठे धोरणमुळे रोहा तालुक्यातील नडवली, तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे ते मालसई निडी अष्टमीपर्यंत तसेच आंबेवाडी संभेपाले किल्ला धाटाव लांढर ते निवी या भागातील बळीराजा अक्षरशः उध्वस्त झाला आहे. केलेली कामे ही निकृट दर्जाची आहेत. नको तेथे मोऱ्या, काँक्रिटिकारण या कामासाठी करोडो रुपयाची उधळपट्टी केल्याचे बोलले जाते. कालव्याचे पाणी तुम्हीच बंद केले तुम्ही सुरु करा अशी मागणी या परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून करीत आहेत.

मागील 40 ते 50 वर्षे सातत्याने कुंडलिकेच्या सिंचनातून उजवा तीर व डावा तीर कालव्या लगत असलेल्या शेतकऱ्यांना पुरेपूर पाणी मिळाले. त्यातून येथील शेतकरी भात पिक घेऊन सुखी समाधानी जीवन जगत होता. मात्र 2011-12 मध्ये सरकारी धोरण म्हणून हे कालवे शेतकऱ्यांकडून दुरुस्तीसाठी घेण्यात आले ते आज 14 ते 15 वर्षे झाली तरी शेतकरी वर्गाला पाणी मिळत नाही.

कुंडलिकेच्या सिंचनातून उजवा तीर 1 ते 8 पुई, गोवे, पुगांव, खांब यामध्ये सुकेळी आंबा खोरे तसेच 9 ते 29 नडवली ते देवकान्हे मालसई निडीतर्फे अष्टमी अशा शेतकऱ्यांना या सिंचनातून पाणी वापर होत होता. तसेच 1 ते 10 कोलाड, चिंचवली, तिसे माणगाव 1 ते 20 आंबेवाडी ते किल्ला, निवी, भुनेश्वर असा समावेश आहे. तसेच 1 ते 33 तिसे, धरणाचीवाडी ते मोरबा असा समावेश आहे. परंतु हे दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले दिसत नाही. त्यामुळे या सर्वच परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले असुन या सर्व परिसरातील काम पूर्ण करून पूर्वीपासून सुरु असणारे पाणी सुरु करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
दरम्यान, कोलाड पाटबंधारे विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.


कुंडलिकेच्या सिंचनातून उजव्या तिरामधून पुई, गोवे गावाच्या भातशेतीला पाणी सोडण्यात येते. हे पाणी गेल्यावर्षी उशिरा सोडण्यात आल्यामुळे भातपीक तयार होण्यासाठी जुन महिना उजाडला. या महिन्यात भातपीके चांगली येऊन तुफान पावसाने कापणी न करताच भातपीक कुजून गेली. यामुळे गोवे तसेच पुई येथील असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एकतर वेळेवर पाणी द्या, नाहीतर कालवा दुरुस्तीच्या नावाखाली पाणी सोडण्यात येणार नसल्याची शेतकऱ्यांना कल्पना द्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया जाणार नाही.

लिलाधर दहिंबेकर,
शेतकरी

Exit mobile version