वनव्यवस्थापन समितीकडून नूतनीकरणास सुरुवात
। माथेरान । वार्ताहर ।
पर्यटकांनाच्या सेवेसाठी असलेले वनव्यवस्थापन समितीचे बायोटॉयलेट हे गेली कित्येक महिने असुविधांचे माहेरघर झाले होते. त्यामुळे येथे येणार्या महिला पर्यटकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यांना येथील बंगल्यातील खासगी शौचालयाचा आधार घ्यावा लागत होता. याबाबत दैनिक कृषीवलने सविस्तर बातमी लावून धरली होती. अखेर या बातमीची दखल घेत शौचालयाच्या नूतनीकरणास वनव्यवस्थापन समितीकडून सुरुवात करण्यात आली असून, या शौचालयांना लवकरच नवसंजीवनी मिळणार आहे. तसेच या शौचालयांची ‘पे अँड यूज’ योजनेंतर्गत काही वर्षांसाठी अश्वपाल संघटनेला ही शौचालये चालवण्यासाठी हस्तांतरित करण्याचा विचार आहे. त्यामुळे येणार्या पर्यटकांना याची चांगली सोयी सुविधा मिळणार आहे.
वनविभागाकडून लाखो रुपये खर्च करून 16 बायोटॉयलेट शौचालये आणली होती.त्यापैकी चार शौचालये एको पॉईंट येथे बसविण्यात आली होती. येथे आलेला पर्यटक हा एको पॉईंटला येतोच येतो, त्यामुळे पर्यटकांना चांगली सुविधा मिळत होती. गेल्या काही महिन्यांपासून वनव्यवस्थापन समितीकडून या शौचालयांकडे दुर्लक्ष केले गेले. याचा नाहक त्रास येथे येणार्या महिला पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होऊ लागला. याबाबत सविस्तर वृत्त रविवार 20 नोव्हेंबरच्या कृषीवल अंकात प्रकाशित करण्यात आले होते.
हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वन व्यवस्थापन समितीला खडबडून जाग आली. अखेर पाच दिवसांतच शौचालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामध्ये पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, तुटलेल्या दरवाज्यांची डागडुजी, शौचालयांची स्वच्छता तसेच आस पासच्या घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यात आले आहे.
योगेश जाधव, अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती
जर ही शौचालये आमच्याकडे हस्तांतरित केली, तर ‘पे अँड युज’ योजनेंतर्गत आम्ही पर्यटकांना चांगली सुविधा देऊ.
आशा कदम, अध्यक्ष, अश्वपाल संघटना