खिशाला परवडणाऱ्या दरात सेवा; प्रवाशांचा प्रवास अत्यंत आनंददायी
| पाली | प्रतिनिधी |
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जलमार्गाने जोडणाऱ्या वेश्वी-बागमांडला फेरीबोट सेवेला सध्या प्रवाशांची आणि पर्यटकांची प्रचंड पसंती मिळताना दिसत आहे. उन्हाळी सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेक पर्यटक रायगडमधील विविध पर्यटनस्थळांना भेटी देऊन या फेरीबोटने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करत आहेत, तर काही पर्यटक रत्नागिरीवरून रायगड मार्गे मुंबई-पुण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत.
अतिशय कमी वेळात आणि खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या खाडीवरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पर्यटक स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि प्रवाशांना या फेरीबोटचाच मोठा आधार मिळत आहे. प्रवाशांचा हा प्रवास अत्यंत आनंददायी आणि उत्साहाचा ठरत आहे.
ही महत्त्वपूर्ण फेरीबोट सेवा ‘सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’द्वारे 2007 मध्ये सुरू करण्यात आली. बाणकोट खाडीवर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट आणि रायगड जिल्ह्यातील बागमांडला दरम्यान धावणाऱ्या या फेरीबोटने प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचत आहेत. या आधुनिक फेरीबोटची क्षमता मोठी असून, यामधून प्रवाशांसोबतच दुचाकी, चारचाकी गाड्या, टेम्पो, बस आणि अगदी प्राण्यांचीही सुरक्षित वाहतूक केली जाते. यामुळे पर्यटकांना स्वतःच्या वाहनासह प्रवास करणे अत्यंत सोपे झाले आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एका किनाऱ्यावर दुसरे किनाऱ्यावर पोहचता येते. विशेष म्हणजे बाराही महिने ही सेवा उपलब्ध असून रात्री दहा वाजेपर्यंत प्रवास करता येतो.
रत्नागिरी पर्यटन या फेरीबोट सेवेमुळे दोन्ही जिल्ह्यांतील पर्यटन स्थळांची साखळी जोडली गेली आहे. फेरीबोटने प्रवास करून थेट मुख्य मार्गिका: वेश्वी – केळशी (महालक्ष्मी मंदिर) – अंजारले समुद्रकिनारा – हर्णे समुद्रकिनारा – सुवर्णदुर्ग किल्ला – मुरुड (दापोली) समुद्रकिनारा – दापोली (कोकण कृषी विद्यापीठ) – लाडघर समुद्रकिनारा – बुतोंडी (भगवान परशुराम मूर्ती) – कोळथरे समुद्रकिनारा – कोळेश्वर मंदिर – दाभोळ (चंडिका मंदिर). दाभोळ येथे पोहोचल्यानंतर पर्यटक तेथील पुढील फेरीबोट सेवेचाही लाभ घेऊ शकतात.
श्रीवर्धन परिसरातील हरिहरेश्वर, दिवेआगार, बोर्ली आणि वेळास समुद्रकिनारा. नंतर दिघी येथून ‘रोहिणी – आगरदांडा’ फेरीबोट सेवेचा पर्याय निवडू शकतात. तेथून पुढे मुरुड-जंजिरा, नांदगाव, काशिद समुद्रकिनारा, अलिबाग आणि रेवस अशी सफर करता येते. तसेच श्रीवर्धन, येथून माणगाववरून मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 ने देखील पुढील प्रवास सुरू ठेवता येतो.
आम्ही या फेरीबोटद्वारे सहकुटुंब प्रवास केला. अतिशय कमी वेळेत आणि कमी पैशात आम्हाला स्वतःची गाडी घेऊन खाडी पार करता आली. यामुळे आमचा प्रवासाचा थकवा वाचला आणि दोन्ही जिल्ह्यांतील निसर्गरम्य पर्यटन स्थळांचा मनसोक्त आनंद घेता आला.
नम्रता सुर्वे,
पर्यटक







