माथेरानमध्ये पारंपारिक गोकुळाष्टमी

| माथेरान | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये श्रीकृष्ण जन्म व दहिहंडी उत्सव पारंपारिक पद्धतीने व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिर परिसरात रात्रीपासून भजनाच्या भक्तिरसात सारा आसमंत न्हाऊन निघाला होता. येथे भजन मंडळींनी अभंगांची उधळण करीत श्रीकृष्ण जन्म साजरा केला.

राज्यात सर्वत्र गोकुळाष्टमीची धूम असताना माथेरानमध्ये हा सण जुन्या रूढी आणि परंपरानुसार ग्रामस्थ उत्सव मंडळाकडून साजरा करण्यात आला. यावेळी परंपरागत आरास करून महिला, पुरुष भक्तगण मंडळी मंदिरात उपस्थित होते. सोमवारी (दि.26) रात्री पासून या उत्सवाला सुरुवात झाली होती. मध्यरात्री रात्री 12 नंतर श्रीकृष्ण जन्म पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. पर्यटकांनी सुद्धा माथेरान मधील पारंपरिक गोकुळाष्टमीचा आनंद घेत दर्शनासाठी श्रीराम मंदिरात गर्दी केली होती. मंगळवारी (दि.27) दुपारी 2 वाजल्यापासून पुन्हा श्रीराम मंदिरात कार्यक्रमांना सुरवात झाली. मंदिरातील सुश्राव्य भजन आटोपल्या नंतर ग्रामस्थ उत्सव मंडळाकडून मानाची दहीहंडी छोट्या बाळगोपाळांकडून फोडण्यात आली. यानंतर येथील सर्व मंडळांकडून दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

Exit mobile version