| खोपोली | प्रतिनिधी |
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर दोन वेगवेगळ्या अपघातांत सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (दि.6) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंकच्या कनेक्टिंग लिंकवर केळी वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन रस्त्यावर उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला. त्याला खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातानंतर पिकअपमधील केळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विखुरली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील केळी हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला. दरम्यान, याच मिसिंग लिंकवर लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील बोगद्यात बस आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाला खोपोलीतील खासगी रुग्णालयात, तर दोघांना पुढील उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही अपघातांनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. अपघातामुळे मिसिंग लिंक परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला.
मिसिंग लिंकवर दोन अपघात; सहा जण जखमी
