मुलींचा पाठलाग करणाऱ्याला अटक

| मुंबई | प्रतिनिधी |

चौपाटीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या दोन मुलींचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या 21वर्षीय आरोपीला 12 तासांत अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.


सविस्तर वृत्त असे की, 17 वर्षांची तक्रारदार तरूणी शिक्षण घेत असून पीडित मुलगी व तिची मैत्रिण 8 ऑगस्ट रोजी चौपाटीवर फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी नोवाटेल चौपाटी ते आनंदा कॅफेदरम्यान एक अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत होती. त्यामुळे दोघीही घाबरल्या. अखेर आरोपीने जवळ येऊन पीडित मुलीचा विनयभंग केला. या प्रकारानंतर पीडित मुलगी व तिची मैत्रिण घाबरली. त्यामुळे त्यांनी याबाबत कोणालाही सांगितले नाही. अखेर पीडित मुलीने जुहू पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दोन मुलींचा पाठलाग करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला होता. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्ष-९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पोलीस पथकाला तात्काळ आरोपीचा शोध घेण्याची सूचना केली. संशयीत आरोपीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव सोहन विष्णूदेव पासवान (21) असून त्याला गुन्हे शाखेच्या कक्षात आणल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. त्यानुसार त्याला जुहू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जुहू पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुळचा बिहारमधील मोतीपूर येथील रहिवासी आहे. तो मुंबईत छोटी मोठी कामे करतो. या घटनेचा अधिक तपास जुहू पोलीस करीत आहेत.

Exit mobile version