| नागोठणे | प्रतिनिधी |
दोघेही नागोठण्यातील एकाच आळीत राहणारे, दोघेही नेहमी नागोठण्यातील अंबा घाटावरील पारावर बसणारे, त्या ठिकाणी नेहमी बराच वेळ बसून एकमेकांशी गप्पा मारणारे. मात्र, याच गप्पांचे पर्यवसान वादात, भांडणात व नंतर हाणामारीत होऊन त्यातील एकावर नाहक जीव गमवायची वेळ आली आहे. मृताचे नाव दीपक दत्तू बोरकर (43) तर त्याला हाणामारी करणाऱ्याचे नाव विकास प्रकाश भोपी (41) असे असून दोघेही नागोठण्यातील खडक आळी भागातील रहिवासी आहेत. सोमवारी (दि.23) दुपारच्या 2.45 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागोठण्यातील अंबा नदी घाटाजवळील हिंदु स्मशानभूमी येथील पारावर नागोठण्यातील खडकआळी येथील दीपक बोरकर व विकास भोपी हे दोघेजण गप्पागोष्टी करत बसले होते. याचदरम्यान त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून आपसात वाद निर्माण झाला. नंतर त्यांच्यात भांडण होऊन एकमेकांना आई बहिणीवरून शिवीगाळी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विकास भोपी याने दिपक बोरकर याच्या छातीमध्ये हाताबुक्क्याने ताकतीने ठोसे मारून त्याला खाली पाडले. दीपक खाली पडल्यावरही विकास याने पुन्हा त्यास पायाने छातीमध्ये व पोटामध्ये लाथा मारून, तुला ठारच करतो असे बोलून दीपक याला जिवे मारले.
सदर गुन्ह्यातील आरोपीस सोमवारी रात्री 8.15 वा.च्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच रोहाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली. मृत दीपक याचा मोठा भाऊ लक्ष्मण बोरकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार नागोठणे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि संदीप पोमण हे करीत आहेत.