आगीत धान्याचे कोठार आणि बेडे भस्मसात
| अलिबाग विशेष | प्रतिनिधी |
मध्यरात्री तीनच्या सुमारास शहरातील रामनाथ जोशी वाडी येथे पेट्रोल ओतून दोन दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे. दुचाकीच्या आगीत जवळच असलेल्या धान्याचे कोठार देखील भस्मसात झाल्याने दहा लाखांवर नुकसान झाले आहे.

याबाबतचे वृत्त असे की, रामनाथ येथील जोशी वाडी येथे लक्ष्मण अंबाजी तांबोळी हे राहतात. त्यांचे तिथे धान्याचे कोठार आणि बेडे आहे. अंगणात उभ्या असलेल्या पॅशन प्रो आणि प्लेझर या दोन दुचाक्या अज्ञात व्यक्तींनी अंगणातून धान्याच्या कोठारा जवळील बेड्यात नेत त्यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्या. आगीने पेट घेत त्याची झळ कोठाराला लागल्याने सदर बेडे तसेच कोठारातील तांदूळ, कडधान्य आगीच्या भक्षस्थानी पडले. कुत्र्याच्या आवाजामुळे जागे झालेल्या लक्ष्मण अंबाजी यांचे नातू निहाल म्हात्रे यांना आग लागल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. नगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न करीत नियंत्रण मिळवले. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.