आंबा, सुपारी धोक्यात
| मुरूड | वार्ताहर |
मुरूड परिसरात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस आल्याने अनेक शेतकर्यांची तारांबळ उडाली. सुमारे 10 मिनिटे पाऊस पडला.अवकाळी पावसामुळे मोहरलेल्या आंबा पिकाचे नुकसान होऊ शकते अशी माहिती रविवारी दुपारी तेलवडे गावच्या काही शेतकरी बांधवांनी दिली.मुरूड तालुक्यात 500 खंडी सुपारीचे उत्पादन होते अशी माहिती मुरूड सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत, यांनी दिली.
मांडवावर वाळत घातलेल्या सुपारीचे आणि झाडावरील सुपारीचे नुकसान अवकाळी पावसामुळे होऊ शकते. मुरूड, आगरदांडा, नांदगाव, बोरलीमंडला आणि तालुक्यातुन सुपारीचे मोठे बागायती क्षेत्र असून येथून सर्व सुपारी विक्री साठी मुरूड सुपारी खरेदी-विक्रीसंघात आणली जाते.येथे सुपारीची वार्षिक सुमारे 5 कोटींची उलाढाल केली जाते. अवकाळी पावसामुळे सुपारीचे नक्की किती नुकसान झाले आहे ते कळलेले नाही.पाऊस कधीही अकस्मात पडू शकतो. त्या मुळे सुपारी बागायतदाराना डोळ्यात तेल घालूनच जागरूक राहावे लागेल.आंबा देखील मोहरला आहे.परंतु पुन्हा पाऊस पडल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता दूर नाही.