आदिवासी वाड्यांवर लसीकरण शिबीर

सामाजिक कार्यकर्त्या मोनिका बडेकर यांचा पुढाकार
। कर्जत । वार्ताहर ।
तालुक्यातील किरवली ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील किरवली ठाकूरवाडी आणि उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आषाणे ठाकुरवाडी मधील आदिवासी बांधवासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांतर्गत एकूण 145 आदिवासी बांधवांनी याचा लाभ घेतला.
शहरी भागात लसीकरण शिबिरे मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत, मात्र ग्रामीण विशेषतः आदिवासी वाड्या- पाड्यावर ती घेतली जात नाहीत. तसेच अद्यापही समाजप्रवाहापासून दूर असणार्‍या आदिवासी समाजामध्ये जनजागृती नसल्याने ते लसीकरणाकडे वळत नाहीत. या गोष्टीचा विचार करून सामाजिक कार्यकर्त्या मोनिका निलेश बडेकर यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने या लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरास कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की, उद्योजक निलेश बडेकर, सरपंच संतोष सांबरी, माजी पंचायत समिती सदस्य भालचंद्र सांबरी यांनी भेट दिली. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका ज्योती वाव्हळ, केवल वारीक यांनी लसीकरणाचे काम पाहिले.

Exit mobile version