अमृतमहोत्सवनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
भारताच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान जाहीर केले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत जिल्हा परिषद स्वातंत्र्याची दिंडी हा उपक्रम 9 ते 16 ऑगस्ट दरम्यान राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजविणे, वृक्षलागवड, स्वच्छ्ता मोहिम राबविणे यासह इतर बाबींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

हर घर तिरंगा या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेमार्फत या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमातून शिवणक्षेत्रात कार्यरत महिला बचत गटांना रोजगार मिळणार आहे. त्यांना झेंडे तयार करण्यास सांगण्यात आले असून, झेंडे विक्रीसाठी महिला महोत्सवात झेंडा विक्री स्टॉल तसेच ग्रामपंचायत स्तरावर सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त शाळांमध्ये झेंडा विक्री सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Exit mobile version