स्वदेशीची विक्री; बाजारात मंदीचे सावट
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
यंदा मुरुडमध्ये आम्ही फटका विक्रेत्यांनी चायना मेड फटाक्यांवर बहिष्कार टाकला असून, केवळ स्वदेशी प्रदूषण टाळणारे फटाके विक्रीस आणले असल्याची माहिती फटाके विक्रेते कुणाल शरद सतविडकर यांनी बोलताना दिली. गेल्या चार वर्षांपासून ते दिवाळीच्या दिवसात फटाके विक्रीचा व्यवसाय मुरूडमध्ये करीत आहेत. मात्र, बाजारपेठेत मंदीचे मोठे सावट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवकाशी येथूनच अधिक फटाके आणले असल्याचे दिसून येत आहे. येथे स्टँडर्ड फायर वर्क्स कंपनीचे फटाके मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्याचे दिसून येत आहे. यंदा फटाक्यांच्या बाबतीत कोणतीही दरवाढ केली नसून, अल्प फायदा घेऊन विक्री सुरू आहे. मात्र, अद्यापही फटाके विक्रीस मोठा प्रतिसाद मिळालेला नाही. मुरूड शहरात फटाके विक्रीची 6 ते 7 दुकाने असून, विविध प्रकारातील प्रदूषण टाळणारे फटाके आम्ही विक्रीस आणले असल्याचे कुणाल सतविडकर यांनी सांगितले. गेल्या वर्षी कोरोनाचे अरिष्ट असल्याने फटाके विक्री मोठ्या प्रमाणात झाली नाही. तरीही यंदा नवीन प्रकारातील इको फ्रेंडली फटाकेदेखील विक्रीस आणले आहेत. फटाके विक्री व्यवसायात 3 ते 4 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यातून 10 ते 15 टक्के फायदा मिळतो. हा व्यवसाय दिवाळीच्या सुमारास आम्ही करतो, अशी माहिती कुणाल यांनी दिली. विविध प्रकारातील फटाक्यांबरोबरच आकाशकंदीलदेखील आणले असून, नारळाच्या झाडांच्या झापांपासून बनविलेले आकर्षक कंदील पहिल्यांदाच आमच्याकडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. हे आकर्षक लक्षवेधी कंदील येथील युवक सिद्धेश प्रदीप पुलेकर, कुणाल पानवलकर, प्रथमेश पुलेकर आणि मित्रांनी बनविले असून, विक्रीस उपलब्ध आहेत, अशी माहिती फटाके विक्रेते कुणाल सतविडकर यांनी दिली. वाढती महागाई आणि रोजगार कमी झाल्याने सणांचा उत्साह कमी होत आहे, अशा भावना अनेक युवकांनी आणि नागरिकांनी व्यक्त केल्या.