आ. महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड असल्याचा ठाकरे गटाचा कांगावा
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील पाडा भागातील राजबाग सोसायटीच्या गेटवर कारमधील एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड रस्त्यात मारहाण करीत असल्याचा आरोप वृत्तवाहिनीवर केला. त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी तो तरुण माझा शिवसैनिक असून, तो माझा बॉडीगार्ड नाही, असा खुलासा केला आहे.
वैयक्तिक वादामधून पिंपलोळी गावातील शिवाजी सोनावले उर्फ शिवा हा तरुण कारमधील एकाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बुधवारी (दि. 11) व्हायरल झाला. हा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीने घेऊन त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांची बाइट घेत कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे बॉडीगार्ड भर रस्त्यात मारहाण करीत असल्याचा आरोप केला. सदर घटना नेरळ गावातील पाडा भागातील राजबाग सोसायटीच्या गेटवर झाली असून, अमोल बांदल या तरुणाला संबंधित पिंपलोळी गावातील शिवाजी सोनावले उर्फ शिवा हा तरुण मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून, अमोल बांदल हे आपल्या वाहनातून नेरळ पाडा भागातून जात होते आणि त्यावेळी शिवा सोनावळे या तरुणाने ही मारहाण केली. त्यावेळी रस्त्याने अनेक दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरू होती. मारहाण केल्यानंतर शिवा सोनावळे तेथून चालत पाडा रेल्वे फाटक येथून पूर्व भागात गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
या मारहाण घटनेची कोणतीही नोंद अमोल बांदल यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे केलेली नाही. मात्र, घटना घडल्यानंतर चार दिवसांनी त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि घटना समोर आली आहे. या घटनेबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांनी आपली प्रतिक्रिया वाहिन्या आणि माध्यमांना दिली आहे. त्यात त्यांनी दोन्ही कार्यकर्ते माझे कार्यकर्ते असून, शिवसैनिक आहेत. बांदल हे माझे नातेवाईक असून, शिवा सोनावळे हादेखील जवळचा कार्यकर्ता आहे. शिवा सोनावळे कधीही माझा बॉडीगार्ड नव्हता. माझ्यासोबत सरकारी पोलीस हाच एकमेव बॉडीगार्ड असतो, असे देखील आमदार थोरवे यांनी स्पष्ट केले आहे. तर, ठाकरे गटाने हा व्हिडिओ मिळवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला असून, ठाकरे गटाचे ते दोघे कार्यकर्ते नसल्याने माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप विरोधकांवर केला.
दरम्यान, या घटनेची कोणतीही नोंद नेरळ पोलीस ठाण्यात नाही, अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे.