| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील वलंग गावच्या विवेक बळीराम म्हामुणकर याने सलग दोन पराभवांनी खचून न जाता, तिसऱ्या प्रयत्नात ‘भारतीय सैन्य दलात’ यशस्वी झेप घेतली आहे. पहिल्या प्रयत्नात मैदानी तर दुसऱ्या प्रयत्नात लेखी परीक्षेत अपयश आले होते. मात्र, आर्थिक टंचाई आणि अपयशाचे चटके अशा दुहेरी संघर्षावर मात करत विवेकने आपले देशसेवेचे स्वप्न अखेर साकार केले आहे.
विवेकचे हे यश त्याच्या कुटुंबाच्या मोठ्या त्यागाचे प्रतीक आहे. त्याची आई उज्वला म्हामुणकर यांनी स्वतः वडापावची गाडी चालवून, उन्हातान्हात कष्ट करत मुलाच्या स्वप्नांना बळ दिले. कठीण काळात काका किशोर विचारे आणि कुटुंबीयांनी त्याचा आत्मविश्वास तुटू दिला नाही. वडापाव विकून मुलाला ‘फौजी’ बनवणाऱ्या आईच्या कष्टांना आणि विवेकच्या चिकाटीला आज संपूर्ण रायगड जिल्हा सलाम करत आहे.







