रस्त्यासाठी स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा

। कोर्लई । वार्ताहर ।

वडखळ राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली असून वारंवार अर्ज, निवेदने देऊनही जाग येत नसल्याने अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते खड्डे अ‍ॅक्टिव्हिस्ट दिलिप जोग कळंबोली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार करीत असून याबाबत पनवेल राष्ट्रीय महामार्ग अभियंता,तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.

वडखळ-अलिबाग, पळस्पे इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाची खाच खळगे व खड्ड्यांमुळे अत्यंत दुरवस्था झाली असून याबाबत वारंवार अर्ज निवेदने देण्यात येऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे कळंबोली येथील जेएनपीटी रोड टी जंक्शन नजीकच्या कार्यालयासमोर नाईलाजास्तव एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करीत आहे.अद्यापही रस्त्यावर योग्य सुधारणा झालेल्या नाहीत आणि अधिकारी केवळ टोलवाटोलवी करीत असतात. नेते दरवेळी भूलथापा देत असतात, असे निवेदनात म्हटले आहे.

अलिबाग-वडखळ रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. सेंटमेरी हायस्कूल ते एचपी पंप, पिंपळभाट राऊतवाडी तीनवीरा स्टॉप ते चरी, पेझारी पोलीस चौकी पोयनाड नाका ते शहाबाज रोड फौजी धाबा, धरमतर पूल दोन्ही बाज वडखळ -एकच सर्विसरोड चालू , पेव्हरचे रस्ते पुढील सर्व सर्विस रोड अत्यंत वाईट अपघातमय झाले आहेत. यामुळे चौपदरीकरण तातडीने होणे गरजेचे आहे.असे निवेदनात म्हटले आहे.

रस्त्याच्या दुरूस्तीचे काम केले तरी पावसाळ्यातील पहिल्या महिन्यातच जैसे थे अवस्था होते. काँक्रिटचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून ते मिक्सरमधून न आणता डंपरमधून आणले जाते. खात्याचा कोणीही अधिकारी कामावर कधीही हजर नसतो. साईडपट्ट्यांची अवस्था अत्यंत वाईट असून रस्त्यामधील डीव्हायडर्स अत्यंत कमी उंचीचे आहेत. रस्त्याच्या डायव्हर्शनला योग्य चिन्हे लावलेली नाहीत, त्यामुळे रस्त्यांवर, पूलांवर पाणी तुंबत आहे. वडखळ-अलिबाग, पळस्पे इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेमुळे दैनंदिन जीवित व वित्त हानीला सामोरे जावे लागत असून नागरिक, प्रवासी वाहनचालकांना याचा त्रास व हाल सहन करावे लागत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version