। पनवेल । वार्ताहर ।
वॉचमनचा खून करून दीड लाखाचा भंगार माल चोरणार्यांना आरोपींना मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात गजाआड केल्याने मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी फेज 1, डोंबिवली पूर्व येथील विजय पेपर प्रॉडक्ट मिल या कंपनीत एका वॉचमनला जीवे ठार मारल्याची घटना दि. 15 जून रोजी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वपोनि शेखर बागडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस पथकास घटनास्थळी रवाना केले. विजय पेपर प्रॉडक्ट मिल या कंपनीत वॉचमन म्हणून काम करणारा ग्यानबहादुर भिमबहादुर गुरुम (64) रा. खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व हा रात्रपाळीमध्ये वॉचमनची ड्युटी करीत असताना काही अनोळखी इसमांनी कंपनीतील भंगार माल चोरी करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या भिंतीवरुन कंपनीत प्रवेश करुन वॉचमन ग्याबहादुर यास कोणत्यातरी टणक हत्याराने त्याचे डोक्यावर, डोळ्यावर, कानाच्या वरील भागावर मारहाण करुन त्यास जीवे ठार मारून कंपनीच्या ऑफिसमध्ये ठेवलेले 1,50,500/- रुपयांचा भंगाराचा माल चोरी करुन नेल्याबाबत जसवंतसिंग रणबहादुर ठाकूर, रा. खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व याने दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास चालू केला.