5 मे रोजी फडके नाट्यगृहात आयोजन
| पनवेल | प्रतिनिधी |
शहरात वाढत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी पनवेल महापालिकेकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. येत्या 5 मे रोजी दुपारी तीन वाजता पनवेलच्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पाणी परिषद’ आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नितीन पाटील यांनी नुकतीच केली. या परिषदेत शहरातील गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा होणार असून, नागरिकांच्या अडचणींना केंद्रस्थानी ठेवले जाणार आहे.
नेमके पुरेसे पाणी पनवेलकरांना कधी मिळणार, या सर्वसामान्यांचे उत्तर या परिषदेत मिळण्यासाठी महापालिका सदस्य प्रयत्नशील असतील. या परिषदेत महापालिकेचे नगरसेवक त्यांच्या-त्यांच्या प्रभागातील पाणीस्थितीचा आढावा मांडणार आहेत. विशेषतः गृहिणींना दररोज भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्यांचा आणि नागरिकांना करावा लागणाऱ्या टँकरवरील अवलंबित्वाचा लेखाजोखा सादर केला जाणार आहे.
खारघर उपनगरातील अनेक मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांची हीच स्थिती आहे. कोट्यवधींची सदनिका खरेदी केली. या स्मार्ट शहरांमध्ये घराजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोल्फ कोर्स, तसेच येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय कोर्पोरेट पार्क असे भव्यदिव्य शहराचे नियोजन असले तरी सध्या या स्मार्ट शहरातील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर लाखो रूपये खर्च करून आपली तहान भागवावी लागत आहे. गेल्या काही वर्षांत खारघर, तळोजा आणि कामोठे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नियमित पाणीपुरवठा न मिळाल्याने टँकर खरेदी करणे भाग पडत आहे. अपुरे पाणी असल्याने प्रशासनाला डोकेदुखी ठरणारी पाणी सेवा अद्याप सिडको मंडळाकडून पनवेल महापालिकेने हस्तांतरण केली नाही. मात्र, नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष्य वेधण्यासाठी निवडणुकीपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको भवनात शिरून आंदोलन केले. विरोधकांनी सिडकोला जाब विचारला. सिडकोने आंदोलन करणाऱ्यांना लेखी आश्वासन दिले. तरीही या प्रश्नावर ठोस उत्तर मिळत नाही.
सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या सुमारे 30 एमएलडी पाण्याची कमतरता आहे. ही तूट भरून काढण्यासाठी प्रशासनाने विविध जलस्रोत वाढविण्याचे आणि जलसंधारणाच्या योजना पूर्ण करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत त्यांच्या प्रयत्नांचा तपशीलही परिषदेत मांडला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये उदंचन केंद्रातून खाडीत वाहून जाणाऱ्या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प, पावसाळी वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर, शिलार धरण या नवीन जलयोजनेसाठी महापालिकेची तयारी, या योजनेसाठी उभारण्यात येणाऱ्या निधीचे पर्याय यांची सविस्तर माहिती यावेळी दिली जाणार आहे.
महापालिकेकडून शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी टँकर मागविण्याची स्पष्ट कार्यपद्धती अद्याप नागरिकांपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच टंचाईच्या काळात मोफत पाणीपुरवठ्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. या सर्व मुद्द्यांवर 5 मे रोजीच्या परिषदेत सखोल चर्चा होणार असल्याने नागरिकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
न्हावा-शेवा टप्पा जल योजनेचे काम पुर्ण झाल्यास पनवेल महापालिका क्षेत्रात 100 एमएलडी पाणीपुरवठा मिळू शकेल. त्यामुळे 228 एमएलडी पाणी पनवेल परिसराला मिळणार आहे. 2020 मध्ये सुरू झालेली ही योजना 2023 या तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र 2026 पर्यंतही ती अपूर्णच आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणूकीत 4800 कोटी रूपयांच्या शिलार धरणाचे कार्यादेश दिल्याची माहिती रोडपाली येथील प्रचारसभेत दिली. मात्र, या योजनेतील पाणी प्रत्यक्षात पनवेलमध्ये येण्यासाठी वर्षानुवर्षे लागणार आहे. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने पनवेलचा पाणी प्रश्नासाठी खास लक्ष्य द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.






