रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा
। जेएनपीटी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या डोळेझाक कारभारामुळे सध्या दिवाळीच्या दिवशी खोपटा गावातील रहिवाशांवर पाण्याच संकट ओढावले आहे. त्यामुळे बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी स्वतःच्या खिशातून टँकरने पाणी पुरवठा करुन घेत आहेत.
उरण तालुक्यातील खोपटा गावातील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन 2015-16 रोजी 1 कोटी 99 लाख 77 हजार 213 रूपयाचा अंदाजपत्रकीय निधी मंजूर करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद अंतर्गत पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून ओम साई कन्स्ट्रक्शनला बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ठेका देण्यात आला होता. परंतु ओम साई कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार रविंद्र नाखवा यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी व अभियंता यांना हाताशी धरून खोटे दस्तऐवज व बनावट स्वाक्षरी करून 1 कोटी 68 लाख रुपयांची रक्कम योजना पुर्ण होण्या अगोदरच काढून घेतली.
सन 2020-21 वर्षे लोटत आल्यानंतरही सदर योजनेच काम अपूर्ण अवस्थेत रेंगाळत पडलेले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवसात बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खोपटा गावातील रहिवाशांना पाण्याच्या संकटात लोटणार्या व 1 कोटी 68 लाखांचा निधी हडप करु पाहणार्या ओम साई कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार रविंद्र नाखवा यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खोपटा गावातील महिला वर्ग करत आहेत.
- बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला होता. परंतु तरीही येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा सामना आजही करावा लागत आहे. – अजित पाटील, सामाजिक कार्यकर्ते
- बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील पाणी योजने संदर्भात ओम साई कन्स्ट्रक्शन वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी रायगड जिल्हा परिषद व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जातीने लक्ष केंद्रित करत आहे. -वेंगुर्लेकर, राजिप पाणी पुरवठा विभाग अभियंता.