वनविभाग, फ्रेंड्स ऑफ नेचरचा पुढाकार
। उरण । प्रतिनिधी ।
रानसई धरण परिसरातील पाणपक्षी गणना करण्यात आली आहे. मा. सहा. वनसंरक्षक अलिबाग व उरण वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण वनविभागाचे वनपाल ज्ञानेश्वर डिविलकर, वनरक्षक संतोष इंगोले आणि राजेंद्र पवार यांच्या सोबत फ्रेंड्स ऑफ नेचर, सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्थेच्या सदस्यांनी व पक्षीनिरीक्षकांनी मिळून पाणपक्षी गणना केली आहे.
उरण तालुक्याला पाणी पुरवठा करणार्या धरणांपैकी रानसई हे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाची जल धारण क्षमता 1 हजार कोटी लिटर म्हणजे 10 एम.सी.एम. इतकी आहे. 1971 साली धरणाची उंची 100 फुट होती. 1981 साली ती 120 फुट करण्यात आली आहे. धरण लांबी 770 फुट आहे. धरणाचे क्षेत्र 3712 एकर आहे. तर, बाधित क्षेत्र 3 हजार 450 एकर आहे. त्यामुळे रानसई धरणाच्या परिसरात मुबलक पाणी व उत्तम अधिवास (जलाशय व गवती माळरान) उपलब्ध असल्याने तेथील जलाशयात अनेक पक्षी आढळतात.
दरम्यान, रविवारी (दि.19) येथील पाणपक्षांची गणना करण्यात आली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत पक्षी गणना करण्यात आली. या गणनेमध्ये एकूण 18 पाणपक्ष्यांसह एकूण 33 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी समूह सापडले आहेत. ही गणणा स्थानिक पक्षी निरीक्षक फ्रेंड्स ऑफ नेचरचे निकेतन ठाकूर, संदीप घरत, यश शेट्टी, उरण वनविभागाचे वनपाल ज्ञानेश्वर डिविलकर, वनरक्षक संतोष इंगोले व राजेंद्र पवार यांनी केली. या गणने नंतरची कार्यवाही म्हणून संबंधित नोंदी ई-बर्ड अॅपवर करण्यात आली. तसेच, स्थानिक वनाविभागासोबत चेक लिस्ट पुढे वरिष्ठाकडे पाठविण्यात आली आहे व अहवाल तयार करून ते वनविभागाला सुपूर्त करण्यात आले आहेत.
पाणथळ संवर्धनासाठी उपाययोजना
ही गणना करताना मोठ्या प्रमाणावर अडथळ्यांचा सामना करावा लागला. कारण धरण परीसरात वाढता मानवी हस्तक्षेप तसेच धरणात अडकलेले मासेमारीसाठी वापण्यात येणारे खराब झालेले जाळे नष्ट करणे, ही आव्हाने व अडथळे येत होते. या समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. पाणथळ जागांचे संवर्धन व उपाययोजना करण्यासाठी संबंधित स्थानिक प्रशासनासोबत चर्चा करून संरक्षणाचे धोरण आखणे, पक्ष्यांना बसण्यासाठी उंचवटे तयार करणे, छुपी शिकार रोखणे, मासिक व वार्षिक गणना उपक्रम नियमितपणे राबविणे, अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.