रोह्यातील तरुणाकडे सापडला शस्त्रसाठा

तलावारी, कोयते, विविध प्राण्यांची शिंगे जप्त

| अलिबाग | प्रतिनिधी |

रोहा येथील एका 24 वर्षीय तरुणाकडे करोडो रुपयांचा बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडला आहे. त्यामध्ये तलवारी, कोयते तसेच हरीण, सांबर आदी प्राण्यांच्या 22 शिंगांच्या जोड्यादेखील मिळून आल्या आहेत. रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेली जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. यामध्ये आणखी काही धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.

तन्मय सतीश भोगटे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण रोह्यामधील धनगरआळी येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याची आई शिवणकाम करीत असून, त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तो बंदूक, काडतूस तयार करणे, विकणे असा बेकायदेशीर धंदा करीत असल्याची माहिती पोलीस शिपाई मोरेश्वर ओमले यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, पोलीस नाईक रुपेश निगडे, विशाल आवळे, पोलीस शिपाई अक्षय सावंत, मोरेश्वर ओमले यांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने पडताळणी करून सोमवारी रात्री त्याच्या घरी छापा टाकला. या छाप्यात चार बंदुका, एक देशी बनावटीचे पिस्तूल, पाच धारदार चाकू, दोन तलवारी, सहा कोयते, 90 जिवंत काडतुसे, पाच रिकामी काडतुसे, बंदूक व काडतूस बनविण्याचे साहित्य, तसेच हरीण, सांबर व इतर प्राण्यांच्या 22 शिंगांच्या जोड्या आढळून आल्या. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून तन्मयला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावी उतीर्ण झालेल्या तन्मयने बंदूक तयार करण्याचे धडे कोठून घेतले. वेगवेगळ्या प्राण्यांची शिंगे, बंदुका त्याच्याकडे कशा आल्या, आदी प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. यामध्ये आणखी कोणीतरी सहभागी असल्याची शक्यता आहे.

आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता असून, त्याचा शोध सुरु आहे. आरोपीची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड
Exit mobile version