| मुंबई | दिलीप |
पेण तालुक्यात संरक्षक बंधारे नादुरुस्त झाल्याने जवळपास दोन हजार एकर शेती खार्यापाण्याखाली जात नापिक झाली आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बाधित शेतकर्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, अशी मागणी शुक्रवारी आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली. या शेतकर्यांना खारभूमी योजनेंतर्गत नुकसान भरपाई द्यावी, अशी आ. पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
खारभूमी योजनेंतर्गत नुकसान भरपाई द्या
पेण तालुक्यातील खारमाचेला, खारचीरब घाट, खारढोंबी, खारमसबाड, खारपाले, खारजांबेला, जुई हब्बास खार भूमी योजनेतील पाच गावांच्या लाभ क्षेत्रातील शेती सुपीक राहण्यासाठी असलेले समुद्र संरक्षक बंधारे नादुरुस्त असल्यामुळे समुद्राचे पाणी शेतात घुसून अंदाजे दोन हजार एकर शेतजमीन नापिक झाल्यामुळे बाधित शेतकर्यांना खारभूमी योजनेंतर्गत त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेकाप आमदार जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, सदर योजनेच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यापूर्वी सन 2018-19 व 2019-20 या काळात रायगड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व मोठी उधाणे जुई अब्बास व माचेला चिरबी या योजनेस खांडी जाऊन शेतीत काही प्रमाणात पाणी घुसले होते. शेतकर्यांच्या मागणीनुसार माचेला चिरबी व जुई हब्बास योजनांच्या नूतनीकरणाचे काम जेएसडब्ल्यू कंपनीमार्फत सीएसआर फंडातून मे-2020 व मार्च-2021 रोजी सुरु करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत माचेला चिरबी योजनेचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, जुई हब्बास 90 टक्के काम पूर्ण झालेले आहे. दोन्ही योजनांचे उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. ही कामे मे -2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले आहे.