चौकशी करण्याची मागणी
। महाड । वार्ताहर ।
विधानसभा मतदार संघात अज्ञात इसमांकडून परस्पर मतदार यादीतील नाव वगळणे तथा स्थलांतरित करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे प्रांतधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांना निवेदन देत संबंधित व्यक्तींची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
महाड विधानसभा मतदारसंघातील अज्ञात व्यक्तीकडून मतदार संघातील मतदारांची नावे कमी करणे अथवा स्थलांतरित करणे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जात आहेत. हे ऑनलाईन अर्ज अज्ञात व्यक्तींकडून केले जात असल्याने याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाड उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांनी याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी महाडमधील शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा नेते हनुमंत जगताप, भूपेश पाटील, रोहित पोरे यांच्या उपस्थितीत डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात महाड विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये मतदारांची नावे वगळण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी परस्पर काही अज्ञात व्यक्ती ऑनलाईन अर्ज करत आहेत. याबाबत योग्य ती खातरजमा करण्यात यावी व प्रत्येक नागरिकास आपल्या हक्काच्या ठिकाणी मतदान करण्याची संधी मिळणे व आपल्या पसंतीचा लोकप्रतिनिधी निवडणे हे लोकशाहीमध्ये असणारे मूलभूत अधिकार आहे. अशा प्रकारे परस्पर अर्ज करणार्यांचा शोध घेऊन या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली.
हेतुपुरस्सर ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांचे, पक्षाला मानणार्या मतदारांची नावे प्रत्येक बूथनिहाय कमी केली जात असल्याचे त्यांना सांगितले.