| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत आणि राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यात स्मार्ट मीटरविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली. अलिबाग तालुक्यातील सुरू झालेला हा मुद्दा जिल्हाभर घेण्याची चर्चा झाली. स्मार्ट मीटरच्या प्रश्नाबाबत जिल्हा चिटणीस मंडळाची विस्तारित बैठक नुकतीच पार पडली.
शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये जनजागृती करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून तालुकास्तरावर दौरा सुरू करण्यात आला. या दौऱ्याच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकांना नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्लार्ट मीटरला वेगवेगळ्या राज्यातून विरोध असताना देखील महाराष्ट्र राज्यात सक्तीने मीटर बसवण्याचा तगादा सरकार करत आहे. भांडवलदारांच्या फायद्यासाठी मीटरचा खर्च बिलांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशातून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्राहकांची मोठी पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे गाव पातळीवर सर्व घटकाला या समस्येतून दूर करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने मोठा लढा सुरू केला. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत हा मुद्दा पटवून देण्याची गरज आहे.
सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी शेकापने भूमिका घेतली आहे. या लढ्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी तालुकास्तरावर मेळावे घेतले जाणार आहेत. पक्ष श्रेष्ठींच्या नेतृत्वाखाली हे मेळावे होणार आहेत. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाखाचा मोर्चा तिसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने स्मार्ट मिटराविरोधात लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खरे यांनी केले.

सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक – ॲड. गौतम पाटील
स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव विद्युत बिलाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी कामगार पक्षाने सुरू केलेल्या लढा सर्व सामान्यांसाठी आशेचे किरण बनले आहे. लाखोच्या संख्येने अलिबागमध्ये मोठ्या आंदोलन होणार आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकाप जिल्हा सहचिटणीस गौतम पाटील यांनी केले. सध्या एस आय आर चे काम सुरू आहे सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घेऊन ही प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हावी यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.असेही ते म्हणाले.






