| रसायनी | वार्ताहर |
प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. प्लास्टिक बंदीसाठी जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जात असले तरी नागरिकांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. याबाबत गाव पातळीवर जनजागृतीचा अभाव असून प्लास्टिक बंदीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरणावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यामध्ये वाढते औद्योगिकरण व पर्यटनामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या राहणीमानात बदल होऊ लागला आहे. जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक घरगुती साहित्य खरेदीपासून वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ खरेदीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. जिल्ह्यातील मासळी विक्रेत्यांपासून भाजी विक्रेते व अन्य खाद्य पदार्थ विक्रेते अशा अनेक व्यावसायिकांकडून प्लास्टिकचा वापर खुलेआम होत आहे.
प्लास्टिकच्या वापराचा पर्यावरणावर मोठा परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पिशवी 300 ते 400 वर्ष नष्ट न होणारी वस्तू आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. प्लास्टिक जाळल्याने श्वसनाचे आजार होण्याची भीती निर्माण होत आहे. प्लास्टिकमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्लास्टिक नाल्यात अडकल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
प्लास्टिक बंदीसाठी जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी विभागाकडून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशवी वापर करण्याचे आवाहन वारंवार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून करीत आहोत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत प्लास्टिक न वापरण्याबाबत ठराव घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गाव पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती सुरू आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही जिल्ह्यात प्लास्टिकचा वापर खुलेआम सुरू आहे.