। डेहराडून । क्रीडा प्रतिनिधी ।
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिस व टेबल टेनिस खेळात महाराष्ट्राची विजयी वाटचाल सुरू आहे. टेनिसममध्ये आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकर यांनी एकेरीच्या उपांत्य फेरी गाठली. तर, टेबल टेनिस सांघिक प्रकारात महाराष्ट्राने पश्चिम बंगालवर मात करीत विजयी सलामी दिली आहे.
परेड मैदानाजवळील टेनिस संकुलात सुरू असलेल्या टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकर यांनी वैयक्तिक विभागात आपली विजय घोडदौड कायम राखली आहे. द्वितीय मानांकित वैष्णवी हिने तमिळनाडूच्या लक्ष्मी अरुण कुमार हिच्यावर 6-3, 7-5 अशी सरळ दोन सेट्स मध्ये मात केली. उपांत्य फेरीत तिच्यापुढे अमोदिनी नाईक तिचे आव्हान असणार आहे.
वैष्णवीच्या तुलनेमध्ये आकांक्षा हिला तेलंगणाच्या डी. लक्ष्मीश्री हिच्या विरूद्ध विजय मिळवताना झगडावे लागले. हा सामना तिने 6-3,4-6,6-2 असा जिंकला. तिसर्या सेटमध्ये आकांक्षा हिला सूर गवसला. तिने दोन वेळा सर्व्हिस ब्रेक मिळविला आणि हा सेट सहज घेत तिने विजयावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत तिला अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू गुजरातच्या वैदेही चौधरी हिच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राने पुरुष गटातील साखळी विभागात पश्चिम बंगालचा 3-0 असा पराभव करीत शानदार प्रारंभ केला. त्यावेळी महाराष्ट्राकडून पहिल्या लढतीत दीपित पाटील याने आकाश पाल याचा 11-7, 3-11, 11-8, 11-13, 11-8 असा पराभव केला आणि महाराष्ट्राला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ रिगान अलबुकर्क याने अनिर्बन घोष याला 13-11, 11-7, 12-6 असे ेसरळ तीन गेम्समध्ये पराभूत करीत महाराष्ट्र संघास 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या तिसर्या लढतीत महाराष्ट्राच्या जश मोदी याने अनिकेत सेन चौधरी याच्यावर 9-11, 11-9, 9-11, 11-8, 11-8 अशी मात करीत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.