नेरळ नळपणी योजनेचे काम ठप्प

मुख्य उद्भव विहिरीचे काम सहा महिन्यांपासून बंद

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी योजना असलेल्या नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. या नळपाणी योजनेची मुख्य उद्भव विहीर उल्हास नदी येथे सुरु असून, त्या विहिरीचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. 2023 मध्ये या नळपाणी योजनेचे भूमीपूजन झाले असून, डिसेंबर 2024 मध्ये या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश आहेत. मात्र, या योजनेमधील बहुतेक सर्व कामे अर्धवट असल्याने नेरळकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

नेरळमध्ये सध्या अस्तित्वात असलेली नळपाणी योजना 1999 मध्ये कार्यान्वित झाली आहे. त्यानंतर या योजनेची मुदत संपली असल्याने गेल्या तीन वर्षांपासून नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये कमी दाबाने पाणी पोहोचत आहे. त्यात नेरळ ग्रामपंचायतीमधील अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना स्थानिक रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीसाठी 2023 मध्ये 40 कोटी खर्चाची नळपाणी योजना मंजूर झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून राबविण्यात येत आलेल्या योजनेचे भूमीपूजन जून 2023 मध्ये स्थानिक अमदारांनी केले होते. जुलै 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आदेश निविदेत आहेत.

मात्र, अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना नेरळ प्रादेशिक नळपणी योजनेचे काम पूर्णपणे ठप्प आहे. योजेनची मुख्य उद्भव विहीर उल्हास नदीवर कुंभे येथे आहे. तेथे विहीर बांधण्यासाठी खोदकाम केले आहे. मात्र, सहा महिने त्या उद्भव विहिरीचे काम बंद आहे. आता पावसाळा तोंडावर आला असून, उल्हास नदीच्या अगदी बाजूला ती विहीर बांधली जात असल्याने पुढील चार महिने पावसाळ्यात विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे.

Exit mobile version