SKP News: शेकापकडून लेखन स्पर्धेचे आयोजन

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मान

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबागतर्फे सोमवारी (दि.15) राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये अमर म्हात्रे, साहिल चौलकर आणि राजश्री कंबार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला. या स्पर्धेचे विषय हे सध्याच्या वास्तविक परिस्थितीवर आधारित होते. त्यामध्ये ‘विकासाच्या गप्पा आणि बेरोजगार युवकांची वास्तवता’, ‘स्पर्धा परीक्षा, पेपर फुटी आणि उद्ध्वस्त होणारे करिअर’, ‘तरुणाई रस्त्यावर आणि सत्ताधारी जाहिरातीत’, आणि ‘शेती, उद्योग आणि ढासळती ग्रामीण अर्थव्यवस्था’, असे चिंतनशील विषय होते. या सर्व विषयाला अनुसरून अनेक स्पर्धकांनी आपल्या लिखाणामधून वैचारिक प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकास 2 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास दिड हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 1 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, नागावचे माजी सरपंच नंदू मयेकर यांच्यासह सुरेश खोत, प्रमोद घासे, प्रा. निशिकांत कोळसे, लेखन स्पर्धेचे समन्वयक प्रा. मिलिंद घाडगे आदी उपस्थित होते.

Exit mobile version