योगी सरकार का योग्य सरकार?

अखिलेश यादव यांचा सवाल
मुख्यमंत्री योगींना केले लक्ष्य
। लखनऊ । वृत्तसंस्था ।
उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षाच्या वतीने आयोजित विजय रथ यात्रेत योगी सरकारवर निक्षाणा साधत, योगी सरकार हवे की योग्य सरकार हवे असा सवाल पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जनतेला केला आहे.
याशिवाय, कुटुंब नसणार्‍या व्यक्तीला सर्वसामान्यांच्या व्यथा समजू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांच्याकडून लोकांची काळजी घेतली जात नाही, अशा बोचर्‍या शब्दांत अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. तसेच, भाजपच्या दमदार सरकार या घोषणेची खिल्ली उडवित ते म्हणाले, की भाजप दमदार झूठ बोलत आहे. भाजपने शिक्षणमित्रांना नोकर्‍यांचे आश्‍वासन दिले होते. मात्र, साडेचार वर्षांनंतर पक्षाने रोजगाराच्या अपेक्षेत असणार्‍या युवकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असल्याचे यादव म्हणाले.
याचप्रमाणे आदित्यनाथ यांना लॅपटॉप वापरता येतो का, आता त्यांना स्मार्टफोनही वापरता येत नसल्याचे समजले. कारण योगी हे गोरखनाथ मंदिराचे महंत (मुख्य पुजारी) आहेत. जर त्यांना ते वापरता येत असते तर त्यांच्या सरकारने आत्तापर्यंत युवकांना लॅपटॉप, स्मार्टफोन दिला असता, अशी टीकाही त्यांनी केली.
तर काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत योगी सरकारने नागरिकांना वार्‍यावर सोडले. यशस्वी उमेदवारांना नोकर्‍या पुरवू शकत नसल्यानेच योगी सरकारने टीईटीची प्रश्‍नपत्रिका फोडल्याचा आरोपही अखिलेश यांनी केला आहे. सप सत्तेवर आल्यास या उमेदवारांना नोकर्‍या दिल्या जातील, असे आश्‍वासनही अखिलेश यांनी दिले आहे.

Exit mobile version