| रायगड | प्रतिनिधी |
हिंदू संस्कृतीमध्ये श्रीफळ म्हणजेच नारळाला अनन्य साधारण महत्व आहे. पूजा अर्चना ते श्राद्ध यासाठी नारळाची जागा अढळ आहे. सर्वसाधारण बाजारात नारळाची किंमत 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत आपण ऐकली असेल. परंतु एक नारळ दोन हजार ते दहा हजार रुपयांना विकला जातो. हे ऐकून नवल वाटणार यात शंका नाही. खेळ्या नारळ असे संबोधन असणाऱ्या हजारो नारळाचा डंका संपूर्ण कोकणात आहे. या नारळाचा उपयोग मंदिरांमध्ये कमी तर नारळ फोडी स्पर्धेसाठी अधिक असल्याने खेळ्या नारळाने सध्या बाजारात खेळाडूंना भुरळ पाडली आहे. नारळ फोडी स्पर्धेला किमान अडीच हजार नारळ फुटतात. यामुळे एका स्पर्धेत लाखो रुपयांची उलाढाल होते.
कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि काही प्रमाणात मुंबई येथे नारळ फोडी या पारंपरिक स्पर्धेचे वेड अजूनही टिकून आहे. पावसाळा सुरू झाला कि, खेळाडूंना वेध लागतात ते नारळ फोडी स्पर्धेचे. 50 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत प्रवेश फी देऊन एक खेळाडू म्हणजे एक संघ असे किमान 250 संघ अशा स्पर्धांमध्ये सहभागी होतात. यामुळे ज्या ठिकाणी नारळ फोडीची स्पर्धा असते, अशा ठिकाणी नारळ विक्रेत्यांची चलती असते. स्पर्धेच्या ठिकाणी किमान अडीच हजार नारळ विक्री होऊन फुटतात. यामध्ये हजारो नारळांच्या ढिगाऱ्यामधून नारळाची कडक कवच असणारा नारळ शोधून स्पर्धक विजयी होतो. एक स्पर्धक किमान 10 नारळ फोडून आपली ताकद आणि चातुर्य सादर करतो. परंतु नारळ फोडी स्पर्धेत गेले अनेक वर्ष खेळ्या नारळ आपले अस्तित्व टिकवून आहे.
कोकणात नारळाचे पीक अधिक आहे. समुद्र किनाऱ्यांवर नारळाच्या बागा उभ्या आहेत. यामुळे स्पर्धेसाठी नारळ सहज उपलब्ध होतात. यामुळे कोकणात नारळ फोडी स्पर्धा आकर्षण ठरली आहे. काही ठिकाणी मैदानात नारळ सरपटी फेकून नारळ फोडला जातो. तर काही ठिकाणी खेळाडूंच्या हातातील नारळ एकमेकांवर आपटून फोडले जातात. सर्रास कोकणातील अनेक गावांमध्ये नारळफोडी स्पर्धा खेळली जाते. परंतु रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात नारळ फोडी स्पर्धेची क्रेझ वेगळी आहे. काही ठिकाणी नाक्यांवर दररोज बक्षिसांच्या बोलीवर नारळ फोडी खेळली जाते. यावेळी साधे नारळ वापरले जातात. या नारळांची किंमत बाजारात खिशाला परवडणारी आहे. परंतु खेळ्या नारळ खिशाला परवडणारा नसलातरी नावलौकिकासाठी या नारळाच्या खरेदीवर झुंबड उडते. स्पर्धेच्या ठिकाणी साधारणतः खेळ्या नारळ घेऊन खेळणाऱ्या स्पर्धकांची संख्या किमान 50 हुन अधिक असते. यामुळे साध्या नारळांच्या तुलनेत खेळ्या नारळामधून होणारी आर्थिक उलाढाल लाखोंच्या घरात आहे.
‘या’ तालुक्यात खेळ्या नारळांची अधिक झाडे
कोकणात असणाऱ्या माडांच्या बागांमध्ये एखादा नारळाचा कल्पवृक्ष मालकाला लखपती बनवून जात आहे. कोकणातील पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये खेळ्या नारळ येणारे माडाचे झाड आढळून येते. आजमितीला पालघर जिल्ह्यात खेळ्या नारळाची झाडे अधिक आहेत. या नारळाच्या झाडाला लागलेल्या एका नारळाची किंमत दोन हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत केली जात आहे. ज्या माडाच्या बागेत खेळ्या नारळाचे झाड आहे. ते झाड एका वर्षाच्या बोलीवर किमान 3 ते 5 लाख रुपयांनी विकत घेतले जाते. अशी अनेक झाडे विकत घेणारे अवलिये कोकणात आहेत. केवळ आणि केवळ नारळ फोडी स्पर्धेत आपल्या नावाचा दबदबा टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धक असे खेळ्या नारळाचा संग्रह करून ठेवतात.