किल्ल्यांचे जतन, पर्यावरणाचे रक्षण
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्याला महत्वपूर्ण ऐतिहासिक वारसा व विस्तृत आणि समृद्ध निसर्ग लाभला आहे. हा वारसा जोपसण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांनी, गड संवर्धन व निसर्ग संवर्धनासाठी ठोस पावले उचलत आहेत. या तरुणांच्या समर्पणामुळे व ध्यासामुळे येथील गडकिल्यांचे जतन आणि पर्यावरण रक्षणाला उभारी मिळत आहेत. विविध संस्था देखील यासाठी पुढाकार घेत असून यामध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे. तरुणांनी अशा विधायक कार्यात स्वतःला झोकून देणे ही बाब अतिशय उल्लेखनीय आहे.
येथील तरुणांनी निसर्ग संरक्षणासाठी विशेष अभियान सुरू केले आहेत. दरम्यान, वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कार्यक्रम घेतले जात आहेत. आतापर्यंत हजारो झाडांची लागवड केली असून, त्यांची नियमित काळजी देखील घेतली जात आहे. निसर्गसंवर्धन मोहिमांमुळे येथील निसर्ग अधिक समृद्ध होत असून जैवविविधता बहरत आहे. मोकळ्या वेळेत तरुण निसर्गात एकरूप होतांना दिसत आहेत. आपल्या आजूबाजूचा निसर्ग कसा संपन्न होईल, यासाठी तरुण पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे गाव पातळीवर देखील तरुण पुढे येत आहेत. तरुणांच्या या उपक्रमांमुळे केवळ गडांचे सौंदर्य टिकून राहत नाही, तर गड संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचा संदेशही दिला जातो. प्लास्टिकमुक्त मोहिम, जलसंवर्धनासाठी पाणथळ जागांचे संरक्षण आणि कचरा व्यवस्थापनाचे धडे आदी उपक्रम देखील यासोबत राबवले जात आहेत.
संवर्धनामुळे किल्ल्यांचे विशेषत्व आबाधित
दुर्गवीर प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, शिवऋण प्रतिष्ठान आदी अनेक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून येथील गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहेत. या मंडळातील सदस्य, गट तसेच अनेक तरुण स्वस्फूर्तीने येथील गडकिल्यांवर स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवत आहेत. जिल्ह्यात रायगड, कुलाबा, खांदेरी-उंदेरी, मुरुड जंजिरा, कर्नाळा, सरसगड, सागरगड, मानगड, तळगड, सुधागड आदी विविध किल्ले आहेत. शिवाय अनेक दुर्लक्षित गड देखील आहेत. या गडकिल्यांवर संवर्धन व स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असल्यामुळे या किल्ल्यांचे विशेषत्व अबाधित आहे.
फक्त झाडे लावणे पुरेसे नाही. ती जगवण्यासाठी देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही लावलेल्या झाडांची तपासणी करून त्यांना पाणी व खत देता, आजूबाजूचे गवत साफ करतो. शिवाय गडसंवर्धन मोहिमा राबवितो. तरुण व ग्रामस्थांना निसर्ग व गडकिल्ल्यांचे महत्त्व पटवून देतो व त्यांचे प्रबोधन करतो. गडांवर गेल्यावर स्वच्छता आणि शिस्त पाहून आम्हाला अभिमान वाटतो. तरुणांसाठी हे उपक्रम खरोखर प्रेरणादायी आहेत.
केतन म्हसके,
उपाध्यक्ष, शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्र