मानद वन्यजीव रक्षकांची यादी जाहीर; वन्यजीव रक्षकांमध्ये तीव्र नाराजी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 13 जुलै रोजी राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, सर्वाधिक वन्यजीव समस्या आणि संवेदनशील क्षेत्र असलेल्या रायगडच्या रोहा वनविभागातून एकाही प्रतिनिधीची नियुक्ती न झाल्याने दक्षिण रायगडमधील वन्यजीव अभ्यासक व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत राज्यातील विविध जिल्ह्यांतून 36 मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातून खारघर (नवी मुंबई) येथील रघुनाथ सवादेकर आणि अलिबाग येथील डॉ. प्रसाद दाभोळकर या दोघांची वर्णी लागली आहे. हे दोन्ही प्रतिनिधी अलिबाग वनविभागाशी संबंधित आहेत. यापूर्वी 30 एप्रिलच्या पहिल्या यादीत 34 जणांची नियुक्ती झाली होती, तर 2021 च्या कार्यकाळात पनवेल, रोहा आणि महाड अशा तीनही भागांना संतुलित प्रतिनिधित्व मिळाले होते. मात्र, यावेळच्या दोन्ही याद्यांमध्ये रोहा वनविभागाला पूर्णपणे वगळण्यात आले आहे.
जैवविविधता, विस्तीर्ण सह्याद्रीचा डोंगराळ पट्टा आणि किनारी भाग लाभलेला रोहा वनविभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या अंतर्गत श्रीवर्धन, मुरुड, म्हसळा, तळा, रोहा, माणगाव, महाड आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना सातत्याने घडत असतात. येथील अनुभवी स्वयंसेवकांनी अर्ज केले होते आणि उपवनसंरक्षक (रोहा) व मुख्य वनसंरक्षक (ठाणे वनवृत्त) यांच्याकडून त्यांच्या नावांची शिफारस वरिष्ठ स्तरावर करण्यात आली होती. तरीही स्थानिक आणि अनुभवी कार्यकर्त्यांची निवड न होणे आश्चर्यकारक मानले जात आहे.
शासनाने प्रक्रियेचा फेरविचार करावा
वन्यजीव संवर्धनाचे काम अधिक प्रभावी करण्यासाठी भौगोलिक संतुलन आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने या प्रक्रियेचा फेरविचार करावा आणि पुढील नियुक्त्यांमध्ये रोहा वनविभागासाठी किमान दोन अतिरिक्त जागा देऊन दक्षिण रायगडला न्याय द्यावा, अशी मागणी वन्यजीवप्रेमी व स्थानिक नागरिकांमधून जोर धरत आहे.
आमच्याकडून सर्व पात्र नावांचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. रोहा विभागातील नावे का जाहीर झाली नाहीत, याबाबत आम्हाला कल्पना नाही.
– शैलेंद्रकुमार जाधव,
उपवनसंरक्षक, रोहा वनविभाग







