महविकास आघाडी मुंबईत धडकणार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिल्ली येथील जंतरमंतर येथे झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. येत्या रविवारी (दि.26) मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क येथे या पार्श्वभूमीवर तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मोर्चातून महाविकास आघाडी मुंबईत धडकणार आहे.
नीट पेपर फुटीप्रकरणी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु केले. शिक्षण मंत्री महेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह पेपर फुटी प्रकरणाची चौकशी पारदर्शक व सखोल करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हजारो तरुण, तरुणी या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र सरकारने पोलिस बलाचा वापर करीत त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला. या अमानुष हल्ल्यात असंख्य तरुण जखमी झाले. तर काही तरुण मृत पावले. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. या प्रकाराबाबत महाविकास आघाडीने आक्रमक भुमिका घेतली आहे. येत्या रविवारी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता, भारताचा तिरंगा हाती घेऊन मुंबईत तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो कार्यकर्ते, सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे रविवारी (दि.26) सकाळी दहा वाजल्यापासून असंख्य मंडळी जमणार आहेत. सरकारच्या या भुमिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जाणार आहे.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या तिरंगा मार्चमध्ये रायगड जिल्ह्यातून शेकापचे असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.






