मृण्मयी बचत गटाला राज्यभरातून मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
ग्रामीण महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देत नेरळ येथील मृण्मयी महिला बचत गटाने लोकरीपासून तयार केलेल्या आकर्षक हस्तकला वस्तूंमधून वेगळी ओळख निर्माण केली आहे. हाताने तयार केलेल्या लोकरीच्या वस्तूंना प्रदर्शनांमध्ये मोठी मागणी मिळत असून, या माध्यमातून अनेक महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळत आहे.
मृण्मयी महिला बचत गटातील महिला एकत्रितपणे लोकरीपासून क्रोशेचे गजरे, आकर्षक पिना, सजावटीच्या वस्तू तसेच मुलींसाठी विविध फॅशन ॲक्सेसरीज तयार करतात. नावीन्यपूर्ण आणि हस्तनिर्मित वस्तूंना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या बचत गटाला विविध हस्तकला प्रदर्शनांमधून सातत्याने निमंत्रणे मिळत आहेत.
नवी मुंबईतील रोटरी क्लब प्रदर्शन, महालक्ष्मी सरस तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रदर्शनांमध्ये मृण्मयी बचत गटाच्या स्टॉलला विशेष प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्यातील विविध प्रदर्शनांमध्ये या बचत गटाची मागणी वाढली आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि आकर्षक उत्पादने तयार करण्यावर भर दिल्याने महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
लोकरीच्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य मला माझी आई आणि आजीकडून मिळाले. हस्तनिर्मित आणि नावीन्यपूर्ण वस्तूंना महिलांकडून चांगली पसंती मिळत असून, त्यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक आधार मिळत आहे.
मृणालिनी शेळके,
अध्यक्षा







