यंदा नव्वद हजारहून अधिक अर्ज
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शासकीय खात्यामध्ये नोकरी मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी आता दहावी, बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणाकडे वळले आहेत. व्यावसायिक शिक्षणामुळे नोकरी, रोजगाराचे साधन खुले होत आहे. त्यामुळे अनेक तरुण या शिक्षणावर भर देत आहेत. यावेळी 90 हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणासाठी अर्ज केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. इंजिनिअरसह आयटीआय, वकील व इतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याची लगबग सुरु झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षणाकडे तरुणांचा कल 40 टक्के वाढला असल्याचे बोलले जात आहे.
पूर्वी दहावी, बारावी झाल्यावर उच्च शिक्षण घेण्याचा क्रेझ प्रचंड होता. उच्च शिक्षण घेतल्यावर सरकारी नोकरी मिळविण्यावर भर अधिक होता आणि व्यवसायिक शिक्षणाकडे प्रवेश घेणाऱ्यांची संख्या नगण्य होती. परंतु, आता उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. शासकीय खात्यात नोकरीसाठी लाखो अर्ज येतात. त्यामध्येही आपला नंबर लागेल की नाही, याची खात्री नसते. त्यामुळे चांगले शिक्षण घेऊनही घरीच बसण्याची वेळ अनेकांवर येते. परंतु, रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना चांगली संधी मिळत आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातही औद्योगिकरणाचे जाळे पसरू लागले आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण संस्थांमार्फत स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होणार आहे, याची जाणीव वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून करून देण्यात आली. गावागावात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. आज रोजगाराची संधी म्हणून आयटीआय, व इतर व्यावसायिक शिक्षणात मिळत आहे. झटपट मिळत असलेल्या नोकरीच्या संधीमुळे विद्यार्थ्यांचा आयटीआय व इतर व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाकडे कल वाढत आहे.
दरम्यान दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर आयटीआय बरोबरच इंजिनिअर व इतर व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे. या शिक्षणासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात धावाधाव होत असल्याचे दिसून येत आहे. व्यवसायिक शिक्षणामुळे नोकरी, रोजगाराचे साधन तातडीने खुले होत असल्याने तरुणांनी व्यवसायिक शिक्षणावर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. यंदा व्यावसायिक शिक्षणासाठी सुमारे 90 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे समोर आले आहे.
शिक्षणातून रोजगाराचे साधन
व्यावसायिक शिक्षणातून रोजगाराचे साधन खुले होण्याची संधी मिळू लागल्याने जिल्ह्यातील अनेक तरुण गेल्या आठ वर्षांपासून व्यवसायिक शिक्षणाकडे वळू लागले आहेत. तरुणांसह तरुणीदेखील या व्यवसायिक शिक्षणाकडे रमू लागले आहेत. शिक्षण पुर्ण झाल्यावर वर्षभर एखाद्या कंपनीत रोजगार मिळते. त्यानंतर अन्य कंपनीत कायम नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक तरुण दहावी, बारावीनंतर व्यवसायिक शिक्षणाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे व्यावसायिक शिक्षणाकडे तरुणांचा कल 40टक्के वाढला असल्याचे बोलले जात आहे.







