| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात सोमवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता ही बैठक रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांच्यासह तालुका चिटणीस सुरेश घरत व वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित असणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन दोन ऑगस्ट रोजी होणार आहे. शेकाप नेते सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा खालापूरमध्ये होणार आहे. रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या भागातून लाल बावट्याचे वादळ खालापूरमध्ये धडकणार आहे. खालापूरमधील राष्ट्रीय महामार्गालगत जुन्या पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या विस्तीर्ण मैदानात हा मेळावा होणार आहे. पुरोगामी विचारांसह, संघर्ष आणि जनतेच्या हक्काचा प्रखर एल्गार हा वर्धापन दिन ठरणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तालुका स्तरावर ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटची बैठक सोमवारी (दि.27) अलिबाग, पनवेल व उरण या तालुक्यांमध्ये होणार आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात आढावा बैठक नेतेमंडळींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर ही बैठक पनवेल व उरण तालुक्यांमध्ये घेतली जाणार असल्याची माहिती शेकापकडून सांगण्यात आली आहे.







