| पेण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्यावतीने महावितरणच्या रायगड परिमंडळ कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात अवाजवी वीज बिले, स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अनेक ग्राहकांना प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त वीज बिले येत असून स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर कराव्यात. ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, शेतकरी, व्यापारी व उद्योगांना खंडित वीज पुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. तसेच, ग्राहकांच्या तक्रारींसाठी विशेष शिबीरे घेऊन तातडीने समस्या सोडवाव्यात, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता धनंजय बिकट यांनी मोर्चेकरांचे सर्व म्हणने ऐकून घेतले. परंतु, याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना स्मार्ट मिटरबाबत बोलणे त्यांनी टाळले. दरम्यान, महावितरण कंपनीने नागरिकांच्या या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जनतेसोबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, तालुका प्रमुख समिर म्हात्रे, अविनाश म्हात्रे, नरेंद्र गावंड, चेतन मोकल, योगेश पाटील, सुलतान साठी व सहकारी उपस्थित होते.







