| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. या प्रस्तावावर मंगळवारपासून लोकसभेत चर्चा सुरू झाली आहे. चर्चेपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली, यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधन केलं. यावेळी पंतप्रधानांनी थेट विरोधकांच्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.
जे लोक सामाजिक न्यायाच्या गप्पा मारत होते, तेच आज भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि तुष्टीकरणामुळे सामाजिक न्यायाचे मोठे नुकसान करत आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. तसेच, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचार क्विट इंडिया, कुटुंबवाद क्विट इंडिया आणि तुष्टीकरण क्विट इंडियाचा नारा दिला. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवरुन पंतप्रधान मोदींनी विरोधकांची खिल्ली उडवली. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही हे काम 2018 मध्ये विरोधकांना दिले होते, जे ते आता करत आहेत. सध्या त्यांच्यातच अविश्वास असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडीचे वर्णन घमंडी आघाडी असे केले. तसेच, अखेरच्या चेंडूवर षटकार मारण्याची संधी म्हणून अविश्वास प्रस्तावाकडे पाहा, असा संदेशही खासदारांना दिला.
संसदेत विरोधकांचा गदारोळ
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांकडून मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला जात आहे आणि यावर पंतप्रधान मोदींनी बोलण्याची मागणी केली जातीये. यादरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला. यावर 8 ते 10 ऑगस्टदरम्यान चर्चा होणार आहे. चर्चेच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेसाठी एकूण 12 तासांचा अवधी निश्चित करण्यात आला असून, त्यात भाजपला 6 तास आणि काँग्रेसला 1 तास देण्यात आला आहे, तर उर्वरित वेळ इतर पक्षांमध्ये विभागण्यात आला आहे.