पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची होतेय मागणी
| नागोठणे | वार्ताहर |
रोहा येथील पत्रकार संघटना व सामाजिक संस्था यांनी एकत्र येत रोहा शहरात फोफावलेल्या अवैध मटका व्यवसायावर नुकतीच बंदी आणली आहे. त्यामुळे मटक्यावर आकडेमोड करणाऱ्यांची गोची झाल्याने त्यांची पावले नागोठण्याकडे वळली आहेत. या प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जातीने व गांभीर्याने लक्ष देऊन हा अवैध मटका व्यवसाय तातडीने बंद करावा, अशी मागणी नागोठणेकरांकडून होत आहे.
नागोठणे या लहान शहरातील विविध अवैध धंद्यामुळे नागोठणेकर त्रस्त झाले आहेत. असे असताना मटका जुगारामुळे नागोठणे शहर व परिसरातील सर्वसामान्य जनतेचा संसार देशोधडीला लागला आहे. नागोठणे शहरात चालणारा मटका जुगार सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे. आम्ही रोहा तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद केले आहेत परंतु नागोठण्यातील अवैध धंद्यांच्या माहितीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे रोहाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी सांगितले.