| रायगड | प्रतिनिधी |
शिवजयंतीनिमित्त अलिबागमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, विभाग प्रमुख नरेश गावंड, कैलास गजने, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, विकास पिंपळे, विशाल ठाकूर व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवरायांच्या जयघोषाने पाली दुमदुमली
पाली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीचे मातोश्री जानकीबाई केशव लिमये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरातील इयत्ता पाहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त शाळा ते छत्रपती शिवाजी चौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, मावळे, राजमाता जिजाऊ अशा विविध पारंपरिक गणवेश परिधान केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय भवानी जय शिवराय’ असा जयघोष करत पाली बाजारपेठ परिसर दुमदुमून टाकला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद, नगराध्यक्षा, नगरसेवक, तरुण वर्ग, शिवप्रेमी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरूडमध्ये शिवरायांना मानवंदना
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्यावतीने नगरपरिषद कार्यालय, लक्ष्मीखार व दत्तवाडी येथे महाराष्ट्राचे राज्य गीत सादर करुन शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

मुरुड-जंजिरा नगरपरिषद कार्यालयातील प्रांगणात शिवजयंतीनिमित्त सुंदर रांगोळी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी 8 वाजता प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आबंतेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तद्नंतर महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले. लक्ष्मीखार येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नायब तहसीलदार संजय तवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर, दत्तवाडी येथील छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राकेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आबंतेकर, सतेज निमकर, प्रशांत कासेकर, आदेश दांडेकर, नायब तहसीलदार संजय तवर, प्रमोद भायदे, राकेश पाटील, कपिल वेहेले, अनिकेत जगदाळे, सोनल पाटील, अभिजित चांदोरकर, सुदेश माळी, सतिष जंजिरकर, दिपक शिंदे, स्वप्नजा विरकुड, शुभ्रा कारभारी, नम्रता करडे, स्मिता मुरूडकर, सायली चोडणेकर, मिनाक्षी गुंजाळ, स्वेता विरुकुड, सोनल विरुकुड, अक्षता तुळसकर, मांढरे, जय भिसे आदिंसह शिवप्रेमी उपस्थित होते.
शैक्षणिक समूहात शिवजयंती साजरी
कर्जत तालुक्यातील तासगावकर शैक्षणिक समूहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी छत्रपती हे आमचे आदर्श असून छत्रपतींचे कार्य विद्यार्थ्यांना समजावे यासाठी जयंती उत्सवाचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याची संकल्पना यावेळी स्पष्ट केली.

कर्जत जवळील चांदईपासून मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी तासगावकर शैक्षणिक समूहातील राज्यातील वेगवगेळ्या भागातील असले तरी विद्यार्थी मराठमोळ्या वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ सादर केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पनवेल महानगर पालिकातर्फे शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. या मिरवणूकीत पनवेल क्षेत्रातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
खांब विभागात शिवजयंती उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोहा तालुक्यातील खांब विभागात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. या जयंती सोहळ्यानिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून व पुष्पमाला अर्पण करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

या विभागातील प्राथमीक शाळांतील विद्यार्थ्यांनी महाराजांची वेशभूषा करून तसेच पारंपरिक वेशभूषा करून गावांमधून रॅली काढून छत्रपती शिवायांबद्दृल व आपल्या देशाबद्दल घोषणा देऊन वातावरण निर्मिती केली. या कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाने शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे गायले, तसेच नृत्य देखील सादर केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनोगतातून शिवाजी राजांचे जीवन आणि कार्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा
शिवजयंती निमित्त सुधागड तालुक्यातील नांदगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचा लोकार्पण सोहळा सुरेश खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यानिमित्त गणेशपूजन, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीचे पूजन, अभिषेक, प्राणप्रतिष्ठा, शिवचरित्र वाचन, मशाल दिंडी, पालखी सोहळा, हरिपाठ, शिवव्याख्यान व भजन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त नांदगाव पंचक्रोशीतील शिवप्रेमी, पदाधिकारी, महिला वर्ग, मान्यवर तसेच श्री काळभैरव ग्रामस्थ मंडळ नांदगाव, काळभैरव क्रीडा मंडळ ठाणे, मुबंई, पुणे येथील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माथेरानमध्ये शिवजयंती साजरी
माथेरान नगरपरिषदेच्यावतीने माथेरानमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महाराजांच्या अर्ध पुतळ्याला प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नगरपरिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक दिलीप अहिरे, शिक्षक लक्ष्मण ढेबे, सचिन भोईर, संतोष चाटसे, अमोल अंधारे, साक्षी कदम, मनिषा चौधरी, किरण शिंदे, शिक्षण समिती पालक संघ अध्यक्षा ज्योती शिंदे, कल्पना पाटील, अंकुश इचके, ज्ञानेश्वर सदगीर, अन्सार महापुळे आदी उपस्थित होते.