प्रदूषणामुळे नागरिक व गुरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली येथील टेंबी व शिक्षक वसाहतीजवळ असलेल्या डम्पिंग ग्राऊंडची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, तेथून होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक आणि गुरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावता तो उघड्यावर टाकणे आणि जाळणे यामुळे वायूप्रदूषण, दुर्गंधी आणि रोगराईचा धोका वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे.

संरक्षक भिंत नसल्याने डम्पिंग ग्राऊंडमधील कचरा अस्ताव्यस्त पसरला असून, काही ठिकाणी तो रस्त्यावरही येत आहे. ओला व सुका कचरा वेगळा न करता एकत्रितपणे येथे टाकला जातो. त्यानंतर कचरा जाळण्याची पद्धत वापरली जाते. सुका कचरा अनेक दिवस जळत राहिल्याने विषारी धूर पसरतो, तर ओला कचरा सडत राहिल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होते. पावसाळ्यात या कचऱ्यातून झिरपणारे दूषित पाणी मानवी वस्तीत शिरत असल्याचीही तक्रार आहे. या ठिकाणाजवळ शिक्षक वसाहत, इतर निवासी वसाहती तसेच मढाळी व शिळोशी गावांकडे जाणारा मार्ग असल्याने रहिवासी, पादचारी आणि वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जनावरांचे आरोग्यही धोक्यात
डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाय, बैल, म्हशी, कुत्रे, कावळे असे पशुपक्षी अन्नाच्या शोधात फिरताना दिसतात. प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकलेले अन्न ते पिशवीसकट खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक गुरांचा मृत्यू झाल्याची नोंद असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
डम्पिंग ग्राऊंड अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपोस्ट पिट्स आणि एमआरएफ शेडचे काम प्रगतीपथावर आहे. कंपोस्ट खड्डे पूर्ण झाल्यावर ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती सुरू होईल. एमआरएफ शेडमध्ये सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून प्लास्टिक बेलिंग मशीनद्वारे प्लास्टिकचे गठ्ठे तयार केले जातील. सुरक्षा भिंतीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे.
-माधुरी मडके,
मुख्याधिकारी, नगरपंचायत पाली
डम्पिंग ग्राऊंडमधील प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नगरपंचायत दोघांचेही दुर्लक्ष आहे. कचरा विल्हेवाटीची यंत्रणा धूळ खात ठेवून कचरा जाळला जातो. एकीकडे क्रीडा मैदानासाठी कोट्यवधींचा निधी, तर दुसरीकडे नागरिक व गुरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते.
-कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली







