पहिली मच्छिमार सहकारी संस्था स्थापन; साळोख धरण परिसरातील महिलांचे ऐतिहासिक पाऊल
| कर्जत | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साळोख धरण परिसरातील आदिवासी महिलांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्ह्यातील पहिली आदिवासी महिलांची मच्छिमार सहकारी संस्था स्थापन केली आहे. ‘जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्था’ या नावाने नोंदणीकृत झालेल्या या संस्थेत सर्व सदस्य आदिवासी महिला असून संस्थेचे नेतृत्व देखील महिलांकडेच राहणार आहे.
कोकण विभागातील ठाणे, रायगड सीमा भागातील नारळाची वाडी आणि फोड्याची वाडी येथे कातकरी व ठाकर आदिवासींचा मोठा वावर आहे. उपजीविकेसाठी या समुदायाचा मासेमारी, शेती, भाजीपाला लागवड तसेच जंगलातील नैसर्गिक उत्पन्नावर आजही मोठा आधार आहे. अनेक महिला दर आठवड्याला 90 ते 100 किलोमीटरचा प्रवास करून मुंबईत जंगलातील उत्पादने विक्रीस नेतात.
सन 1984 मध्ये बांधलेल्या साळोख धरणातील मासेमारीचे टेंडर वर्षानुवर्षे बाहेरील कंत्राटदारांना दिले जात होते. स्थानिक आदिवासींना प्राधान्य न मिळाल्याने महिलांना हक्काच्या जलस्रोतामध्येही लपूनछपून मासेमारी करावी लागत होती. पकडले जाणे, अपमानास्पद वागणूक आणि कंत्राटदारांकडून होणारा त्रास हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला होता. या अन्यायाविरुद्ध स्थानिक नेत्या सुनीता कांबडी, तसेच निसर्ग सामाजिक संस्था आणि कोरो इंडिया यांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले. तब्बल अकरा महिन्यांच्या सततच्या बैठका, लोकजागृती, लोकवाटा जमा करणे आणि प्रशासकीय अडचणींवर मात केल्यानंतर अखेर संस्थेची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली.
26 जानेवारी 2026प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणात मासे सोडून मत्स्य पुनर्भरणाचा कार्यक्रम पार पडला. याच दिवशी ‘जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्थे’ला तलाव ठेका मिळाल्याची अधिकृत नोटीस फलकावर धरण परिसरात लावण्यात आली. कातकरी आणि ठाकर समुदायांची सामूहिक संसाधन व्यवस्थापनाची परंपरा पुन्हा दृढ करण्याचा संस्थेचा हेतू आहे. जमीन, जंगल, जल या तिन्ही घटकांच्या एकत्रित उपजीविका मॉडेलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘जिजाऊ’ संस्था कार्यरत राहणार आहे.
आमच्या महिलांनी अनेक वर्षे अपमान, भीती आणि असुरक्षिततेमध्ये मासेमारी केली. हक्काचा जलस्रोत असताना त्याचा उपयोग करण्यासाठी लपूनछपून जावे लागते, ही आमच्यासाठी अत्यंत वेदनादायक गोष्ट होती. पण आम्ही हार मानली नाही. गावोगाव जाऊन चर्चा केल्या, महिलांना एकत्र केलं आणि अडथळ्यांना तोंड देत शेवटी ‘जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्था’ उभी केली. आज हा तलाव आम्हाला कायदेशीररित्या मिळाला आहे, हा आमच्यासाठी स्वाभिमानाचा क्षण आहे. महिलांच्या नेतृत्वात चालणारी ही संस्था केवळ रोजगार देणार नाही तर आमच्या पुढच्या पिढीसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक भविष्य तयार करेल. निसर्ग सामाजिक संस्था आणि कोरो इंडिया यांनी दिलेल्या साथीसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आता हा तलाव आणि ही सहकारी संस्था आमच्या महिलांची ताकद, आमचा हक्क आणि आमचा अभिमान आहे.”
स्थानिक आदिवासी महिलांनी आपल्या हक्कासाठी उभे राहून मिळवलेला हा विजय केवळ रोजगाराचे साधन निर्माण करणारा नसून सन्मान, स्वावलंबन आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरत आहे.
– सुनिता कांबडी, (अध्यक्ष)
जिजाऊ मच्छिमार सहकारी संस्था’






