। उत्तर प्रदेश । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये होळीच्या दिवशी यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात घडल्याची घटना मंगळवारी (दि.3) पहाटे घडली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. प्रवासी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. सदाबाद पोलीस स्टेशन परिसरातील हरिया गढी गावाजवळ पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव डबल डेकर स्लीपर बसने कारला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, इको व्हॅनमधून एकूण 13 जण प्रवास करत होते. हे सर्वजण दिल्लीच्या प्रेमनगर भागातील रहिवासी होते आणि होळी साजरी करण्यासाठी राजस्थानमधील धोलपूर येथे जात होते. होळी साजरी करण्यासाठी जाताना वाटेतच काळाने घाला घातला. नोएडाहून गोरखपूरला जाणाऱ्या डबल डेकर स्लीपर बसने इको व्हॅनला मागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की व्हॅनचा चक्काचूर झाला. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातामध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. जखमींमध्ये तीन मुलं, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. गंभीर जखमी मुलांना उपचारासाठी आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. दोन मुलांची प्रकृती सध्या गंभीर आहे असे डॉक्टरांनी सांगितले. अपघातामध्ये वाहन चालक सुदैवाने बचावला. पोलिसांनी बस चालाकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातानंतर यमुना एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आता वाहतूक पूर्ववत केली आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.







