धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील नागरिक अक्षरशः मृत्यूच्या सावलीत जगत असताना, प्रशासन मात्र ‘बघून कारवाई करतो’ या गुळगुळीत उत्तराने वेळ मारून नेत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धोकादायक इमारतींबाबत वारंवार विचारणा करूनही अधिकारी वर्ग केवळ आश्वासनांची धूळफेक करत असल्याचे चित्र आहे. या अधिकाऱ्यांना फक्त 3 वर्षे नोकरी करून बदली करून जायचे असल्याने जनतेच्या जीविताचे काहीही देणंघेणं उरलेले नाही, असा थेट आरोप नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनावरील विश्वास ढासळताना दिसत आहे.
उरण शहरातील अनेक इमारतींची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, त्या कधीही कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत. काही ठिकाणी वरचे मजले पाडून इमारत जैसे थे ठेवून खाली दुकाने सुरू आहेत, तर काही ठिकाणी नव्याने बांधकाम सुरू असल्याचे चित्र आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, धोकादायक घोषित इमारतींमध्येही खुलेआम व्यवसाय सुरू असून नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात घालण्यात येत आहे. उरण नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी वर्गाने पूर्णपणे कानाडोळा केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. एखादी दुर्घटना घडली आणि जीवितहानी झाली, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेच्या बांधकाम विभागावरच राहील, असा इशारा जनतेकडून देण्यात येत आहे.
कोटनाका येथील मासळी मार्केट परिसरात तर परिस्थिती अधिकच भीषण आहे. येथे प्रचंड वर्दळ असताना, इमारतीच्या वरच्या मजल्यावर मोठ्या भेगा पडल्या असून त्या कधीही कोसळू शकतात. खाली मात्र मासळी विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी कायम असते. अशा परिस्थितीत प्रशासनाचे मौन हे जीवाशी खेळ असल्याचे बोलले जात आहे. वीर सावरकर मैदानाजवळील मोक्याच्या जागेवरील इमारतींची अवस्था देखील तितकीच गंभीर आहे. याशिवाय, शहरात अनधिकृत बांधकामांचा महापूर आला असून, या सगळ्या प्रकारात अधिकारी वर्गानेच आपले उखळ पांढरे करून घेतल्याची धक्कादायक चर्चा रंगू लागली आहे. या सगळ्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट लोकप्रतिनिधींनाच आवाहन केले आहे. नगराध्यक्षा भावना घाणेकर आणि उपनगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती यांनी स्वतः शहरातील धोकादायक इमारतींची तात्काळ पाहणी करून, जनतेच्या जीविताच्या दृष्टीने त्या पावसाळ्यापूर्वी जमीनदोस्त करण्याची ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.






