उड्डाणपूलअभावी अपघातांचे प्रमाण वाढले; ठेकेदारांचा चुकीचा निर्णय
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील वरसगाव-भिरा फाट्यावर उड्डाणपूल न बनविल्यामुळे या महामार्गांवर अपघाताची मालिका सुरु आहे. याला जबाबदार मुंबई-गोवा हायवेचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार हे असल्याचे बोलले जात आहेत. कारण मुंबई-गोवा हायवेवरील अनेक छोट्या गावासाठी उड्डाणपूल बनविण्यात आला आहे. परंतु, मुरुड-भिरा मार्गांवरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या राज्यमार्गांवरील भिरा फाट्यावर उड्डाणपूल असावा, असे महामार्ग अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना जाणीव का झाली नाही का?, मुंबई-गोवा मार्गांवरील भिरा फाट्यावर डोळे मिटून सर्व्हे केला काय? असे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांकडून बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली 17 वर्षांपासून सुरु असून ते एका वर्षात पूर्णही होईल. यामुळे या महामार्गांवर वाहनांचा वेग वाढणार आहे. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी येथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. तेही निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे हे गतिरोधक वेगाची नशा अपघाताचे कारण ठरत आहे. या गतिरोधकामुळे गेल्या महिन्यात एकाच दिवशी दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. तसेच, गेल्या आठवड्यात दोन कार एकमेकांना आदळून अपघात झाला. यात सर्व प्रवाशांना किरकोळ मार लागल्यामुळे ते थोडक्यात बचावले. परंतु, दरवेळी असेच होईल असे नाही.
मुंबई-गोवा महामार्गांवरून गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आंबेवाडी बाजारपेठेत उड्डाणपुलाचे काम सुरु असल्यामुळे त्या ठिकाणी मातीचे ढिगारे ठेवले आहेत. त्या ठिकाणी काम सुरु असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु ते फक्त दिवसा दिसण्यासाठी सक्षम आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रिप्लेक्टर तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रकाशाची सोय नसल्यामुळे वाहन चालकांना पुढील परिस्थितीची कल्पना येत नाही. यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.
मुंबई-गोवा महामार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर भिरा फाट्यावर वाहतूकीचा वेग अधिक वाढणार आहे. यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. येथे अंडरपास रस्ता होणे महत्वाचे होते. परंतु, याची गरज का वाटली नाही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आता येथे ब्लिकिंग सिग्नल लावणे आवश्यक आहे. गेल्या वर्षांपासून येथे पथदिवे लावण्यात आले आहेत. परंतु, अद्यापही ते सुरु केले नाहीत. तसेच, हायवेचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी येथील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करावी.
– विश्वास बागुल, कुणबी समाज युवा कार्यकर्ते, वरसगांव





