| अलिबाग | प्रतिनिधी |
भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या माध्यमातून 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून ”रायगड जिल्ह्यात कौशल्य विकासातील अनोखा उपक्रम” बुधवारी (दि.30) एप्रिल रोजी मुख्य कार्यालय सहाण- अलिबाग या ठिकाणी कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
समाजातील तळागाळातील निरक्षर, अपूर्ण खंडित शिक्षण झालेल्या व जे. एस. एस. रायगडच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. दुर्लक्षित प्रशिक्षणार्थींमध्ये उच्च शिक्षणाची प्रेरणा जागृत व्हावी, शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळावे. तसेच उच्च पदवी प्राप्ती वातावरण निर्मितीचे स्वरूप त्यांना कळावे या उद्देशाने सदर समारंभाचे स्वरूप दीक्षांत समारंभा सारखे करण्यात आले होते. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जे. एस. एस. रायगडचा कौशल्य दीक्षांत सोहळा हा अनोखा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. जन शिक्षण संस्थान योजनेच्या माध्यमातून जनसामान्यांचा सन्मान होत असल्याचे डॉ. मेधा सोमैया यांनी व्यक्त केले. तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सदर व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे डॉ. नितीन गांधी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. विजय हिरामण कोकणे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रतिक्षा चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी रुईया कॉलेज रसायनशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. विद्या दिघे जी, विलास दिघे जी, डॉ. नितीन गांधी, डॉ. विजय कोकणे, नरेन जाधव, संजय राऊत, प्रतिक्षा चव्हाण, कल्पना म्हात्रे, अक्षता जामकर, रेखा घरत, कविता म्हात्रे, श्रेया पाटील तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.







