| उरण | प्रतिनिधी ।
खोल समुद्रातील मासेमारी एक जूनपासुन बंद होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच मच्छीमारांनी बोटींची रंगरंगोटी, जाळ्यांची दुरुस्ती अशा कामांची तयारी सुरू केली आहे. मच्छीमारांना यावर्षीच्या हंगामात अनेक संकटांचा सामना करावा लागला.
गेल्या वर्षी पावसाळ्यातील बंदीनंतरही अनेक वादळे आल्यामुळे मासेमारी बंद ठेवावी लागली. अनेकदा खोल समुद्रात जाऊनही मासेमारी न करताच रिकाम्या हातांनी परतावे लागले. परिणामी मच्छीमारांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. त्यातच डिझेल, जाळी, बर्फ यांच्या दरात वाढ झाली. याचाही फटका व्यवसायाला बसला. बदलत्या वातावरणामुळे मासळीचे प्रमाण घटल्याने नुकसान सहन करावे लागते. त्यातच अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा डिझेल दरवाढ झाली. यामुळे मासेमारी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी दीड ते दोन लाखांपर्यत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पध्दतीत पकडली जाते. चांगल्या प्रतिची निर्यात करण्यायोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पध्दतीच्या मच्छीमारांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे, अशी माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली.
जून महिन्यात बंद होणारी मासेमारी ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे. त्यावेळी निरव, शांत झालेल्या सागरात मासेमारीसाठी पोषक वातावरण असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी बोटी सज्ज ठेवण्याची तयारी मच्छीमार करत आहेत. बोटींची रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती, इंजिन आणि इतर तत्सम साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू आहे. यामुळे ससुनडॉक, करंजा, मोरा, कसारा या बंदरांत हजारो बोटींची गर्दी झाली आहे.
डिझेलसाठी निर्णय आवश्यक
पावसाळी 61 दिवसांच्या बंदीनंतर मासेमारी एक ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी मच्छीमारांना शासनातर्फे मिळणारा डिझेलचा कोटा वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी आतापासूनच बैठका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता मच्छीमार व्यक्त करत आहेत.







