| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम 4 ते 5 वर्षांपासून ठप्प आहे. त्यामुळे या बसस्थानकाची निवारा शेड आणि नवीन सुसज्ज बसस्थानक बांधकामाच्या संदर्भात मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी मंगळवारी (दि.25) राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. तसेच नूतनीकरणाचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पाली हे प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक असून, येथे भाविकांची वर्षभर मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मुंबई-पुण्याजवळ असल्याने चाकरमानी व स्थलांतरित नागरिक येथे मोठ्या संख्येने येत असतात. पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे नेहमीच नागरिकांची, तसेच शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. मागील पाच वर्षांपूर्वी येथील बस स्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी अजूनही नवीन इमारत उभारली गेली नसून स्थानकाचे नूतनीकरणाचे काम ठप्प आहे. बसस्थानक परिसरात महिला प्रवाशांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी कोणतीही स्वच्छतागृहांची अपुरी सोय असल्याने त्यांची प्रचंड कोंडी व गैरसोय होत आहे. या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदनावर शेरा मारून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी व पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे पाली-सुधागडमधील प्रवाशांना लवकरच हक्काचे आणि सुसज्ज बसस्थानक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.







