जीवना, दांडा जेट्टी प्रकल्पांमुळे समुद्रपातळीत बदल; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धनमध्ये सुरू असलेल्या जीवना जेट्टी आणि दांडा जेट्टी प्रकल्पांमुळे विकासाच्या नावाखाली किनारपट्टीच्या नैसर्गिक रचनेत बदल होत असल्याची चिंता आता स्थानिक नागरिकांमध्ये वाढू लागली आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेली ही कामे अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, समुद्राच्या पाणीपातळीतील बदल, किनाऱ्यावरील वाढता दाब आणि भविष्यातील संभाव्य धोके यावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
रेस्ट हाऊस परिसर आणि लगतच्या समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी ओहोटीच्या काळात 100 ते 150 मीटरपर्यंत समुद्र मागे सरकत असे. त्यामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाळूचा पट्टा दिसत होता. मात्र, आता उन्हाळ्याच्या दिवसांतही समुद्राचे पाणी किनाऱ्यालगत कायम राहू लागले असून, अनेक ठिकाणी ते थेट संरक्षण कठड्याला धडकताना दिसत आहे. यामुळे समुद्राच्या नैसर्गिक प्रवाहात आणि गाळ साचण्याच्या प्रक्रियेत बदल झाला आहे का, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले आहेत. भरती, मुसळधार पाऊस आणि वादळी हवामान यांचा एकत्रित परिणाम झाल्यास समुद्राचे पाणी किनाऱ्यालगतच्या वस्त्यांपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. काही रहिवाशांनी तर “आज पाणी कठड्यापर्यंत आले आहे, उद्या ते घरांच्या दारापर्यंत येणार नाही ना?” असा सवाल उपस्थित केला आहे.
मागील वर्षी गणेशोत्सवाच्या काळात समुद्राच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. समुद्रकिनाऱ्यावरील उपलब्ध जागा कमी झाल्याने विसर्जन प्रक्रिया अवघड झाली होती. तो अनुभव अजूनही लोकांच्या स्मरणात असून, यंदा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जेट्टी प्रकल्पांमुळे मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि सागरी वाहतुकीला चालना मिळेल, असा दावा केला जात असला तरी स्थानिक नागरिक या प्रकल्पांच्या उद्देशांबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. समुद्राच्या पाणीपातळीतील बदल, किनारपट्टीची धूप आणि जेट्टी प्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यातील संभाव्य संकट टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या समुद्र शांत दिसत असला तरी किनारपट्टीवरील बदल अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि गंभीर असू शकतात. त्यामुळे प्रशासन, तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रितपणे या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.







