एल-निनोचा शेतीवर परिणाम; शेतीमध्ये बदल करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
| नेरळ | प्रतिनिधी |
भारतीय हवामान विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा अंदाज जाहीर केला आहे. यंदा एल-निनो परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 16.44 टक्के कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषीविद्या विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पूर्व-हंगाम सल्ला (मिशन मौसम-3) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेतीमध्ये बदल करण्याची सूचना केली आहे.
कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्याचा खरीप हंगामातील सरासरी पाऊस सुमारे 3275 मिमी इतका आहे. मात्र, यावर्षी ऐतिहासिक पर्जन्यमानाच्या विश्लेषणाचा आधार घेतला असता यापूर्वी जेव्हा जेव्हा कमी पावसाची वर्षे आली, तेव्हा तालुक्यात सुमारे 2736 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत यंदा 16.44 टक्के कमी पाऊस पडण्याचा थेट धोका निर्माण झाला आहे. एल-निनोमुळे शेतीसमोर उभी ठाकणारी मुख्य आव्हाने उभी राहिली आहेत. याबाबत प्रकल्प प्रमुख डॉ. वैभव राजेमहाडीक, विभाग प्रमुख डॉ. अशोककुमार चव्हाण आणि यंग प्रोफेशनलचे सचिन गुरव यांनी शेतकऱ्यांना हवामानातील या संभाव्य धोक्यांची माहिती दिली आहे मान्सूनला होणार विलंब पाहता यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. यंदा दीर्घकालीन पावसाचा खंड राहणार असून, पाऊस सुरू झाल्यानंतरही त्यात मोठा खंड पडू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.पावसाच्या लपंडावामुळे पावसाअभावी पिकांच्या उगवण अवस्थेत आणि वाढीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांवर जमिनीतील ओलावा संपून पिके सुकण्याचा धोका वाढेल. या हवामानजन्य उत्पादन जोखमीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पीक पद्धतीत बदल करणे आणि कृषी निविष्ठांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असा सल्ला जज्ज्ञांनी दिला आहे.
महत्वाच्या सुचना
जास्त पाणी लागणाऱ्या पिकांचे क्षेत्र घटवा, अशी महत्वाची सूचना शास्त्रज्ञांकडून करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यामध्ये भात हे मुख्य पीक असून, ते पावसातील कमतरता आणि दीर्घ कोरड्या कालावधीस सर्वाधिक संवेदनशील आहे. विशेषतः तालुक्यातील वरकस (हलक्या) जमिनी आणि ज्या भागात जमिनीतील ओलावा टिकून राहण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे भात खाचरांमध्ये पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे यावेळी रत्नागिरी-73, कर्जत-184, रत्नागिरी-24, कर्जत-3, कर्जत-4 आणि कर्जत-7 या वाणांची शिफरस करण्यात आली आहे. त्याचबरोबर वरी, नागली, नाचणी तूर व चवळी अशी पीके घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.







